Take a fresh look at your lifestyle.

लोकांनी सगळ्या पातळ्या सोडल्या आहेत; हेमांगीच्या समर्थनार्थ ट्रोलर्सवर बरसल्या चित्रा वाघ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे सध्या सर्वत्र ती चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या परखड भाष्याचे आणि विचारांचे स्वागत केले आहे तर काहींनी मात्र तिला ट्रोल करणे मनावर घेतले आहे. त्यामुळे या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र हेमांगीचे समर्थन करीत ट्रोलर्सला चपराक लगावली आहे. शिवाय “किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही?” असा सवाल यानिमित्त त्यांनी उपस्थित केला आहे.

हेमांगीच्या बाई, बुब्स आणि ब्रा या पोस्टला सोशल मीडियावर भले संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतील. मात्र तिला कलाकार मंडळी आणि अगदी राजकीय महिला मंडळींकडून चांगलाच पाठिंबा मिळत आहे. अश्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले कि,’ हेमांगी कवीने फार साधा व्हिडिओ शेअर केला होता. ती त्यात पोळ्या लाटताना दिसत आहे. मात्र इंस्टाग्रामवर नेटकऱ्यांकडून नको त्या गोष्टींवर बारीक रितीने पाहणे, त्यावर अश्लील लिहिणे, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या सोडलेल्या आहेत’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच बेधडक मत व्यक्त करते. या आधीसुद्धा तिला विविध मुद्द्यांवरून विचित्र पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते. कधी मेकअप, कधी लूक, कधी घरातले कपडे असे कोणतेही मुद्दे धरून ट्रोलर्स तिच्यावर निशाणा साधताना दिसले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा हेमांगीने या ट्रोलर्सचे वेळीच तोंड बंद केल्याचे दिसले आहे. आजच्या युगातही लोकांची मानसिकता बाईविषयी अशी का असावी? हा अनेक स्त्रियांच्या मनामनातला प्रश्न असला तरीही कुणी यावर स्पष्ट भाष्य करत नाही. कारण, समाज..म्हणूनच या मुद्द्याला हात घालत हेमांगीने अनेको स्त्रियांच्या मनातील एक कप्पा व्यक्त केला आहे. तिची हि पोस्ट पाहिल्यानंतर निश्चितच अनेक लोकांच्या विचारसरणीवर प्रभाव पडेल आणि बाईचे असणे आणि तिचे जगणे याबाबत किंचित का होईना समाज सुधारित विचार करेल अशी आशा आहे.