Take a fresh look at your lifestyle.

कलाकारांच्या न्यायासाठी CINTAA’ने उठवला आवाज; कामगार आयुक्तांसमोर वाचला समस्यांचा पाढा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्रामध्ये किरण माने हे प्रकरण फारच चर्चेत आहे. हे प्रकरण केवळ त्या कलाकारापूर्ता राहिलेले नाही. एव्हाना यात अनेक राजकीय पक्ष आणि अनेक विविध स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एक ठराविक राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेतून काढल्याचा आरोप मानेंनी केला होता. यानंतर हे प्रकरण बरंच चिघळलं. यात कलाकाराची गळचेपी केली म्हणून स्टार प्रवाह वाहिनीला टीकांचा सामना करावा लागला. यानंतर आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर, कलाकारांसंबंधी नियमांमधील बदलांबाबत चर्चा करण्यासाठी आणि कलाकारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सिने आणि टीव्ही कलाकार संघटना (CINTAA)ने आवाज उठवला आहे.

CINTAA

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (CINTAA) सदस्यांनी नुकतीच मुंबईतील कामगार भवन, बीकेसी येथे अतिरिक्त कामगार आयुक्त शिरीन एस लोखंडे आणि सचिव विनिता वेद सिंघल यांची भेट घेतली. दरम्यान प्रतिनिधींनी भारतातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शूटिंग नियमांमधील बदलांबाबतच्या चिंतेवर चर्चा केली. यामध्ये कलाकारांच्या समस्या त्यांना होणारा त्रास याबाबतही चर्चा केली गेली. यानंतर माननीय कामगार आयुक्तांनी पुढील समस्यांची दखल घेतली असलयाचे समोर आले आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

१) जे अभिनेते एका महिन्यात ७ दिवसांपेक्षा कमी काम करतात त्यांना कराराखाली आणले जाईल आणि ३० दिवसांच्या आत पैसे दिले जातील.

२) मुलांनी दिवसातून ८ तासांपेक्षा जास्त काम करू नये आणि त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे असावीत.

३) अभिनेत्यांना लवकरात लवकर कंत्राटी कागदपत्रे देण्यात यावीत.

४) शुटिंग शिफ्टच्या विचित्र तासांच्या बाबतीत जसे की खूप लवकर कॉल टाइम्स आणि रात्री उशिरा पॅक अप असेल तर, महिला आणि बाल कलाकारांना त्यांच्या घरातून पिक- अप आणि ड्रॉप प्रदान करावा.

५) एकसमान करारासाठी विनंती आणि ब्रॉडकास्टरचा पक्ष करार म्हणून समावेश करावा.

६) पेमेंटमध्ये होणारा विलंब टाळला जावा.

७) कलाकारांना प्रथम निर्मात्यांनी कराराची अनैच्छिक प्रत दिली पाहिजे. दोन्हीकडे कराराची सारखीच प्रत असायला हवी यावर भर दिला पाहिजे.

अशाप्रकारे कलाकारांच्या समस्यांवर चर्चा करून त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी कामगार आयुक्तांना लेखी पत्रदेखील देण्यात आले आहे. यावेळी CINTAA कडून सहसचिव संजय भाटिया, सीईओ सतीश वासन आणि कार्यकारी समिती सदस्य हेतल परमार आदी मान्यवर उपस्थित होते.