Take a fresh look at your lifestyle.

हिंदुस्थानी भाऊ’ला सशर्त जामीन; 17 दिवसांच्या कोठडीनंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊ ला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला असून एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 30 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.  त्यामुळे, गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात असलेला हिंदुस्थानी भाऊ आता जेलमधून बाहेर येईल.

राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊ वर करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली होती.

हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक हा एक युट्युबर आहे. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिजनमध्ये हिंदुस्थानी भाऊ झळकला होता. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. दरम्यान त्याच्या व्हायरल व्हिडिओतील वक्तव्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आणि परिणामी विद्यार्थी आंदोलनाचा असा काही उद्रेक झाला कि सरकारला घाम फुटला होता. या परिस्थितीतही हिंदुस्थानी भाऊचे चाहते त्याच्या समर्थनात दिसून आले होते.