Take a fresh look at your lifestyle.

Corona ऑन – ऑफ? विजू मानेंनी सरकारच्या दुखत्या नसेवर ठेवलं बोट; पोस्ट झाली व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात ओमिक्रॉन विषाणूविषयी विविध बातम्या प्रसारित होताना दिसत आहेत. कधी याबाबत फार चिंता व्यक्त केली जाते. तर कधी हा विषाणू सौम्य असल्याचे म्हटले जाते. पण हा विषाणू कसा का असेना.. याचा थेट परिणाम होतो तो थिएटर व्यवसायावर. गेली २ वर्षे थिएटर बंद होते. मात्र आता कुठे थिएटर खुली झाली आहेत. पण ५०% क्षमतेने. याचा परिणाम थिएटर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक जीवनावर होत आहे. म्हणूनच मराठी दिगदर्शक आणि लेखक विजू माने यांनी एक विचार करायला लावणारी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काही शंका व्यक्त करीत अख्खी प्रश्नावली पोस्ट केली आहे.

विजू माने यांनी फेसबुकवर पोस्ट करीत लिहिले कि, माझ्या मनातील काही शंका ( सदर पोस्ट राजकीय नाही, ज्यांना राजकीय संबंध आणि टिप्पणी करायची असेल त्यांनी लांब रहा) ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांचे वारे वाहू लागले आहेत, पण ह्या काही गोष्टी आकलनाच्या बाहेर आहेत. ज्यांना काही लॉजिकल शंकानिरसन करणे शक्य आहे, त्यांनी कमेंट मध्ये सांगा.
१. परदेशी प्रवास करून आलेल्यांमध्ये तो आढळत असेल तर त्यांना अटकाव विमानतळावरच का केला जाऊ शकत नाही?
२. कुणी म्हणतं ओमायक्रोन घातक आहे कुणी म्हणतं नाही, हे सगळं कुणीतरी सांगण्यापेक्षा, अधिकारवाणीने सरकारी प्रतिनिधी प्रमुख वाहिन्यांवरून, वृत्तपत्रांमधून किंवा अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवरून मन की बात सदृश एखाद्या कार्यक्रमातून सांगू शकत नाही का?
३. ओमायक्रोन जास्त घातक आहे की WhatsApp वरच्या अफवा ह्याचा कुणी विचार करत का?
४.असेच परावर्तित कोरोनाचे अवतार कायम येत राहणार मग आपण कायमच थिएटर ५० टक्के क्षमतेने चालवणार का?
५. ओमायक्रोन नंतर oh my god… ओ मेरी जान… वगैरे नावाचा कोरोना अवतार यायला सज्ज आहे अश्या विनाकारण घाबरवून सोडणाऱ्या बातम्या देणाऱ्या हाहाकारी मिडिया वर नियंत्रण येण्याची शक्यता आहे का?
६. Vaccine’च्या बूस्टर डोसच्या certificate वर सन्माननीय पंतप्रधानानंतर का होईना, ज्याने डोस घेतला आहे त्याचा फोटो येऊ शकेल का? ( मॉलमध्ये प्रवेश करताना केवळ सर्टिफिकेट पाहिले जातं, ते कोणाचं आहे हे तपासले जात नाही म्हणून ही शंका.)
७. बार, मार्केट, बस, ट्रेन, राजकीय सभा, मेळावे, विमान, लग्न, मुंज, बारसे, साखरपुडा आदी समारंभ वगळता केवळ थिएटर मध्येच कोरोना कसा काय लपून राहतो? मी माझ्या कुटुंबासोबत बसने, रिक्षाने अथवा माझ्या गाडीतून थिएटरपर्यंत जातो तिथे गेल्यावर मात्र आम्ही एक एक सीट सोडून का बसतो?
८. नाट्य- चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सलमान खान किंवा अक्षय कुमार इतकेच कोट्यवधी रुपये मिळतात हा सर्वसाधारण समज आहे का?
९. केवळ महाराष्ट्र किंवा आपला भारत देश नव्हे तर संपूर्ण जगात अशाच प्रकारचं logical confusion आहे का?
१०. मुळात अशा शंका उपस्थित करणे रास्त आहे का?

या पोस्टवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट एकापेक्षा एक आहेत. त्या वाचाल तर कदाचित तुम्हीही विचारात पडालं. एका नेटकऱ्याने लिहिले, विजू सर खूप छान मुद्दे उपस्थित केले आहेत सगळयांना ह्या शंका आहेत. पण सर काही मुद्दे असे आहेत की काही केलं तरी त्याच उत्तर हे राजकीय प्रतिनिधी पर्यंत जातेच मग अश्या वेळी प्रश्न विचारायचे कोणाला..? तर अन्य एकाने लिहिले योग्य जागेवर बोट ठेवल आहे विजू सर.