हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागपूर येथील विचारवंत, लेखक आणि अभिनेते म्हणून ओळख असणारे वीरा साथीदार यांचे वयाच्या ६१व्या वर्षी कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे. प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्काराचे नामांकन पटकाविणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. दरम्यान त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वीरा साथीदार हे नागपूर येथील बाबुलखेडा येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. त्यांची स्थिती हलाखीची होती. घराचे भाडे देणेही एकेवेळी त्यांच्यासाठी अशक्य झाले होते. “माझ्या घराचं भाडं भरण्यासाठी मी असमर्थ आहे. माझे मित्र माझी अनेकदा मदत करतात’,असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या पत्नी नागपूरपासून ३० किलोमीटर लांब एका आंगणवाडीत काम करतात. “पत्नी काम संपल्यानंतर तिथेच कुठेतरी राहण्याचा बंदोबस्त करते. याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. कारण दररोज प्रवासाचा खर्च परवडेनासे आहे. ती दरमहा सात हजार रुपये कमावते आणि संपूर्ण घरखर्च तीच उचलते. तिला थोडा आराम मिळावा यासाठी मी खूप प्रयत्न करतो”,असेही त्यांनी सांगितले.
वीरा साथीदार यांच्या आई आणि बाबानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसोबत काम केले होते. मात्र घराची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे साथीदार त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. सुरुवातील नागपूर मध्येच एका फॅक्टरीत ते काम करायचे. आपली लिखाणाची आणि अभिनयाची आवड जोपासत ते कष्ट करीत घर देखील चालवत होते. कोर्ट या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे तब्बल १८ पुरस्कार पटकावले. मात्र वीरा साथीदार ह्यांची परिस्थिती जैसे थे अशीच होती,हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
Discussion about this post