Take a fresh look at your lifestyle.

आपलाच बायोपिक रुपेरी पडद्यावर पाहून क्रिकेटपटू प्रवीण तांबे झाले भावुक; साश्रू नयनांनी झाले व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रिकेटपटू प्रवीण तांबे हे नाव हा चेहरा अनेकांना माहितही नव्हता. पण आज जेव्हा त्यांच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला तेव्हा ‘कौन प्रवीण तांबे..?’ या प्रश्नाच उत्तर सर्वानाच मिळालं. कौन प्रवीण तांबे..? असे या बायोपिक चित्रपटाचे नाव आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने प्रवीण तांबेंची भूमिका साकारली आहे. दरम्यान खुद्द प्रवीण यांनी जेव्हा कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघासोबत हा चित्रपट पाहिला तेव्हा साश्रू नयनांनी त्यांनी भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ केकेआरच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये संपूर्ण KKR ची टीम दिसत आहे. दरम्यान केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर या व्हिडिओमध्ये म्हणतोय कि, “आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो आणि आज अखेर आम्हाला तो पाहायला मिळाला. चित्रपट पाहून आम्हीसुद्धा भावूक झालो. त्यातली गाणीही छान होती. शेवटी प्रवीण तांबे यांचं भाषण ऐकून मीसुद्धा भावूक झालो होतो.” वय हा केवळ आकडा आहे, ही म्हण प्रवीण तांबे यांना तंतोतंत लागू होते. वयाच्या ४१ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या तांबेंनी हे दाखवून दिलं की, वयानुसार स्वप्नांची व्याख्या करता येत नाही.

तर स्वतः प्रवीण तांबे जेव्हा व्यक्त झाले तेव्हा आधी उर भरून आलेला आणि डोळ्यात आनंदाश्रूंचे घरंगळणे दिसून आले. यानंतर प्रवीण तांबे दाटलेल्या कंठातून म्हणाले कि, “बर्‍याच लोकांना माहित आहे की मी ४१ वर्षांचा असताना पदार्पण केलं होतं, परंतु त्याआधी मी काय केलं हे त्यांना माहीतच नव्हतं. या चित्रपटाच्या माध्यमातून ते माझा संघर्ष पाहतील आणि मला जाणून घेतील अशी आशा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण कधीही हार मानू नये, हे यातून त्यांना समजेल”.