हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुमारे १३ वर्षांपूर्वी १६ मे २००८ साली प्रदर्शित झालेला कौटुंबिक आणि धम्माल कॉमेडी चित्रपट दे धक्का याने मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळाच इतिहास दिला. या चित्रपटाने अशी काही धमाल उडवली होती कि आजही हा चित्रपट कित्येकांना तोंडपाठ आहे. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांचा अवली आणि तुफान अंदाज या विनोदी चित्रपटात पाहायला मिळाला होता. आजही टीव्हीवर हा चित्रपट लागला कि अख्खे कुटुंब जमून हा चित्रपट पाहतात इतकी याची विशेष पसंति आहे. सर्वांची वाहवा मिळवलेल्या या दे धक्का चित्रपटाचा आता दुसरा भाग येत असून, त्याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या वर्षाची सुरुवात या धमाल चित्रपटाने होणार ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले आहे.
दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस
महेश मांजरेकर दिग्दर्शित
दे धक्का २
तारीख ठरली!!!
१ जानेवारी २०२२
थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय
घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय@manjrekarmahesh @SIDDHARTH23OCT pic.twitter.com/ehd8OzkxDP— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 29, 2021
‘दे धक्का २’ हा चित्रपट येत्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात १ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी ‘दे धक्का २’च्या रिलिजची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणाले की, दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या रिलिजची तारीख ठरली. १ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याशिवाय आपल्या ट्विटच्या अखेरीस अमेय खोपकर यांनी ‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’, असा दे धक्काची आठवण करून देणारा संदेश दिला आहे.
‘दे धक्का २’ या चित्रपटामध्ये ‘दे धक्का’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले कलाकारच प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मात्र आता हे कलाकार इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. यापूर्वी दे धक्का चित्रपटाने मराठी प्रेक्षकवर्गाच्या मनात वेगळं आणि अढळ असं स्थान मिळवलं होत. इतकेच काय तर चित्रपटातील अनेक संवाद प्रेक्षकांच्या अजूनही जसेच्या तसे आठवणीत आहेत. त्यामुळे आता ‘दे धक्का २’ च्या माध्यमातून हे कलाकार विनोदाची कशी धमाल करतात यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
Discussion about this post