Take a fresh look at your lifestyle.

मंजुळेंच्या ‘झुंड’वर बंदीची मागणी; न्यायालयाकडून निर्मात्याला 10 लाखांचा दंड..? काय आहे प्रकरण?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाच्या रिलीजनंतर सर्वत्र त्याचा बोलबाला आहे. स्क्रीनिंग नंतर सर्व स्तरावर फक्त आणि फक्त झुंड चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाचे कथानक, वास्तववादी अभिनय, कथानकातील लयबद्धता या साऱ्याने प्रेक्षक आणि समीक्षक भारावून गेले आहेत. एकीकडे हिंदीतील दिग्गज कलाकारांपासून अगदी निर्माते आणि दिग्दर्शक यांनीही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असताना दुसरीकडे आता या चित्रपटावर बंदी आणा अशी मागणी केली जात आहे.

सत्य घटनेवर आधारित एक क्रिडा प्रशिक्षक आणि त्याचे झोपडपट्टीतील विद्यार्थी यांच्यावर बेतलेल्या झुंडच्या यशाला बहुतेक नजर लागली असावी. कारण असे असताना झुंडवर बंदी घाला अशी मागणी होणे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी मोठा धक्काच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा सिनेमा स्थगित करा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे. हैद्राबादमधील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी हि याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी झुंड या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.

याप्रकरणी सुनावणी झाली असून यात तेलंगणा उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता निर्माते नंदी चिन्नी कुमार यांना संबंधित याचिकेवरून १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने त्यांना ही रक्कम एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड- १९ रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने रक्कम वेळेत न भरल्यास जिल्हाधिकार्‍यांनी ३० दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून पीएम फंडात पाठवावी, असे कडक आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी हा खटला सुरू केला होता, ज्यांनी दावा केला होता की फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा अधिकार त्यांनी विकत घेतला आहे. तर झुंड हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील विजय यांची भूमिका अमिताभ बच्चन हे साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.