Take a fresh look at your lifestyle.

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट  

0

चित्रपट परिक्षण |अमित येवले

काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले एकदम मार्मिक सत्य यामध्ये दिग्दर्शकाने योग्यपणे मांडले आहे. चित्रपटाची संपूर्ण मांडणी ही एका गावातील वास्तव दृश्यांवर दाखवण्यात आली आहे. की जे गाव काही तरी सुधारणा करू पाहत आहे, पण त्यांना हे विकासाचे गणित तयार करतांना पायाभूत सुविधांपेक्षा काही तरुणांना या ‘देऊळ’ ची संकल्पना ठीक वाटते आणि मग पुढील सर्व काही या देऊळ च्या भोवती विकास, राजकारण, रोजंदारी, झुंडशाही कशी निर्माण होते हे दाखवण्याच्या योग्य प्रयत्न केला आहे. आणि या सर्व जोडीला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि नसिरुद्दीन शहा यांनी प्रभावी कामगिरी करुन या चित्रपटाला एका उंचीवर नेऊन सोडले आहे.

सुरवातीला गिरीश कुलकर्णी (किश्या) हा त्याची करडी नावाची गाय शोधत असतो, ती त्याला बऱ्याच वेळेपासुन सापडत नव्हती, शेवटी एका टेकडीवर त्याला ती सापडते आणि मग तेथून हा सीनेमा ‘टर्न’ घेतो. किश्याला स्वप्नात औदूंबराच्या झाडामध्ये दत्त दिसतो, आणि नंतर सकाळी तेथे एक सुतार त्याच्या एका सवंगडयाला मोबाइल वरुन मापे सांगतांना त्या झाडावर खानाखुणा करतो आणि मग तेथे गावातील लोकांना दत्ताचा ‘त्रिमूर्ती’ आकार दिसतो. गावातील युवा राजकारणी आप्पा, महासंग्रामचा पत्रकार व त्यांचे एक दोघे बेकार मित्र याचा फायदा घेऊन दत्त अवतरल्याची बातमी छापतात. यामुळे आजुबाजुला चर्चा रंगल्यामुळे तेथील ग्रामसभा मंदिर बांधण्याचा निर्णय घेते. यामध्ये भाऊ (नाना पाटेकर) यांच्या विरोध असतांना देखील त्यांच्या निर्णय कसा पलटतो हे पहाणे गंमतीशीर वाटते.या सर्व प्रकारामुळे नाना कुलकर्ण्यांचे (दिलीप प्रभावळकर) ग्रामीण रुग्णालयाचे अभ्यासपूर्ण असे मॉडेल बाजूला पडते. त्यामुळे ते गाव सोडून बंगलौर येथे जाण्याचा निर्णय घेतात.

मग दत्त मंदिर उभे करण्यासाठी पूर्ण गांव कामाला लागते. शाळेतील शिक्षक मुलांना घरूण देणगी आणायला भाग पाडतात, मुलांना इतरांच्या मोबाईल वर दताच्या संर्दभात मेसेज करायला लावतात. पूर्ण गांव दत्तमय होऊन जाते, दत्तमंदिराबाहेर स्टॉल लावण्यासाठी बोली सुरु होतात. प्रत्येक जण या मध्ये भाग घेताना दिसतो आणि यामध्ये आपला आर्थिक विकास कसा होईल ते पहात असतो. कोणी चारचाकी गाडीवर बळजबरीने दत्ताचे स्टिकर चिपकवते आणि पैसे घेते तर देवदर्शनाची माहिती दिली म्हणून माहिती सांगीतल्याचे पैसे घेतो.

चमत्कारासाठी साधू आणून बसविला जातो, करडी मातेचे मंदिर बांधुन तिला चारा पैसे घेऊन दिला जातो.हे असे सगळे साक्षात्काराचे, चमत्काराचे मार्केटिंग दत्ताच्या नावाखाली खपने चालु होते. देवभाव कमी आणि व्यवहारी भाव जास्त प्रकट होतो. काही काही विबत्स चाली वर दत्ताची गाणी रचली जातात आणि त्याची मोठ्या प्रमाणात कैसेट च्या रुपात विक्री होते.

जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो. येथे पण हेच दाखवण्यात आले आहे. ज्याने दत्त प्रकटले हे सांगितले…व जिच्यामुळे दत्तदर्शन घडले, यांचा विसर येथे पडलेला दिसतो. करडी गायीच्या पायाला जखम झाली असते, पण तिच्या कडे दुर्लक्ष केले जाते, आणि किश्याला या मंदिरात मंत्री आल्यावर बाहेर अडवून मारहाण करण्यात येते.ही स्वतःची झालेली कोंडी पाहून किशा अस्वस्थ होतो. त्याला दरोडेखोर (नसरूदीन शहा) याच्या रुपात साक्षात्कार होतो.मग तो देवाची मूळ मूर्तीच चोरून नदीत विसर्जित करतो. पण यामधुन साध्य काहीच होत नाही लोकांच्या धार्मिकतेच्या भावनांवर येथील राजकारणी लगेच वाजत गाजत नवी दत्त मूर्तीची स्थापना मंदिरात करतात. यामध्येच चित्रपटाचा शेवट करण्यात आला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकाला एक सामाजिक दर्शन घडत जाते. नानांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांची समाजाप्रती असलेली जाणीव हे वेगळे पणाने या मध्ये भासते. गिरीश कुलकर्णी यांचा अभिनय हा खूप पाहण्यासारखा आहे. सरपंचाची सासू म्हणून खूप मनोरंजक अशी भूमिका उषा नाडकर्णी यांनी केली आहे.

दिग्दर्शन
उमेश विनायक कुळकर्णी

निर्मिती
देविशा फिल्म्स (अभिजीत घोलप)

कथा
गिरीश कुलकर्णी

पटकथा
गिरीश कुलकर्णी

प्रमुख कलाकार
गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, नासिरुद्दीन शाह

अमित येवले

Leave a Reply

%d bloggers like this: