Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्रीने धारण केले बंगाली देवीचे स्वरूप; भाविकांना घडले त्रिनयन दुर्गामातेचे भव्य दर्शन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामुळे सर्वत्र शांततेचे, अध्यात्माचे आणि सात्विक पावित्र्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्र हा उत्सव स्त्री शक्तीच्या स्वरुपांची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो. यातील प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व आहे. या निमित्ताने शक्तीची नानाविध रूप साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या चाहत्यांना आईच्या मूळ स्वरूपाचे दर्शन देण्यास पुढारली आहे. तिने केलेल्या या फोटोशूटच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या शक्तिपीठांची रूपे ती चाहते आणि भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देताना दिसत आहे.

आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तिने बंगाली देवीचे स्वरूप धारण केले आहे. या देवीला बंगाल राज्यातील लोकांमध्ये दुर्गा स्वरूपी ओळखले आणि मानले जाते. हा फोटो शेअर करताना अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, नवरात्रीचा पाचवा दिवस! रंग – पांढरा. देवी – बंगाली देवी. त्रिनयन दुर्गामाता, त्रिपूरा अगरतला. नवरात्रीतील नऊ अवतार- देवी शैलपुत्री, देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी महागौरी, देवी सिद्धीदात्री. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

बंगालमध्ये दुर्गामातेची भक्ती भावे पूजा केली जाते. खरतर दुर्गापूजेची परंपरा हि सुमारे ४०० वर्ष जुनी असून हि प्रथा बंगालमधील तारिकपूर भागात सुरू झाली. यानंतर बंगालमधून ही प्रथा बनारस (सद्य – वाराणसी) व आसामला पोहोचली. पुढे इ.स.१९११ पासून दिल्लीतदेखील ही पूजा सुरू झाली. खरतर दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. बंगालमध्ये नवरात्रीतील शेवटच्या सहाव्या दिवशी (षष्ठी ते दसरा) दुर्गापूजा केली जाते.

याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. तर तिसऱ्या दिवशी तिने कर्नाटक उडपी येथील दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते आणि चौथ्या दिवशी राशीनची यमाई माताचे रूप धारण केलेले फोटोशूट तिने शेअर केले आहे. तिच्या या फोटोशूटला प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे.