फक्त मराठी सिनेसन्मान प्रथम पुष्प 2022; ‘धर्मवीर’ आणि ‘चंद्रमुखी’ चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फक्त मराठी सिनेसन्मान सोहळा २०२२’ अलीकडेच २७ जुलै २०२२ रोजी अंधेरी येथे पार पडला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. अभिनेता अमेय वाघ आणि हास्यवीर ओमकार भोजने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दरम्यान आशिष पाटील यांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली.
या सिने सोहळ्यात रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांचा सन्मान केला गेला. यांचा सन्मान अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते पार पडला. तर सिने सृष्टीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये धर्मवीर चित्रपटासाठी प्रसाद ओक तर चंद्रमुखी चित्रपटासाठी अमृता खानविलकर यांचा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या महा सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान अभिनेता प्रसाद ओकने पटकावला. त्याला हा पुरस्कार ‘धर्मवीर’ या चित्रपटासाठी मिळाला. शिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सन्मान धर्मवीर चित्रपटासाठी प्रवीण तरडे यांनी पटकावला. इतकेच नव्हे तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मानदेखील ‘धर्मवीर’ चित्रपटाने पटकावला.
तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अभिनेत्री अमृता खानविलकर हिने पटकावला. तिला हा पुरस्कार ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी मिळाला आहे. तर चंद्रमुखी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथाकार हा सन्मान विश्वास पाटील यांना मिळाला. फक्त मराठी सिने सन्मान सोहळ्याचं हे पहिलंच वर्ष असून दणक्यात पार पडलं.
याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि संगीतकार जोडी अजय-अतुलयांचा देखील ‘फक्त मराठीने’ विशेष सन्मान केला. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला विको पॉप्युलर ‘फेस ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांना गदगदून हसवणारे विनोदाचे बादशाह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्यांच्या गाजलेल्या विविध भूमिकांना घेऊन काही कलाकारांनी त्यांना मानवंदनादेखील दिली. मुख्य म्हणजे सचिन पिळगावकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनीला शरद पिळगावकर यांच्या हस्ते ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना सन्मानित केलं गेलं.