रवी जाधव यांची नवी इनिंग; हिंदी वेब विश्वात करणार पदार्पण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टी विश्वातील दिग्दर्शन क्षेत्रातील अत्यंत नामांकित नाव म्हणजे रवी जाधव. त्यांनी नेहमीच बहारदार कथानकांसह नवनवीन कलाकृती सिनेसृष्टीला दिले आहेत. यानंतर आता रवी जाधव पुन्हा एकदा मोठे योगदान देणार आहेत. यावेळी रवी जाधव हिंदी वेब विश्वात पदार्पण करीत आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून दिली आहे. या फोटोमध्ये आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव, प्रसिद्ध नाटककार, गीतकार, थिएटर दिग्दर्शक आणि पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन आणि GSEAMS चे अर्जुन सिंग बरन, कार्तिक डी निशानदार दिसत आहेत. दरम्यान GSEAMS ने एक हिंदी वेब सिरीज करत असल्याचे जाहीर केले आहे आणि याचे दिग्दर्शन रवी जाधव करीत असून क्षितिज पटवर्धन लिखित आहे.
मराठी दिग्दर्शक रवी जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील अत्यंत प्रभावी दिग्दर्शक आहेत. रवी जाधव दिग्दर्शित नटरंग आणि बालगंधर्व या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय बालक पालक, टाइमपास, न्यूड हे चित्रपट देखील त्यांचे गाजले आहेत. तर क्षितिज पटवर्धन हे पटकथा लेखक, नाट्य दिग्दर्शक, नाटककार आणि गीतकार आहेत. त्यांना पटकथेसाठी आणि गीत लेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ते चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात प्रतिभावान लेखक मानले जातात. टाईमपास, टाइम प्लीज, वाय झेड, क्लासमेट्स या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आहे.
दरम्यान मराठी सिने सृष्टी गाजवल्यानंतर आता हे दिग्दर्शक हिंदी वेब विश्व गाजवण्यास सज्ज झाले आहेत. आपल्या आगामी नव्याकोऱ्या प्रोजेक्टबाबत माहिती देताना अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशंकदार म्हणाले कि, नवीन वेब सिरीजसाठी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान कलाकारांमुळे तिला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.