Take a fresh look at your lifestyle.

दिग्दर्शक एस.एस.राजामौलींचा ‘RRR’ होणार अनेक भाषांमध्ये प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटावर सध्या सर्वांचे लक्ष आहे. जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे अगदी तेव्हापासूनच चाहते त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट अत्यंत चर्चेत आहे. आरआरआरचा फर्स्ट लूकही चाहत्यांसाठी आता सादर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचली आहे. नुकतीच या चित्रपटाविषयी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. हा चित्रपट म्हणे एक दोन नव्हे तर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट आरआरआर संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या डिजिटल भागीदारांची घोषणा केली आहे, असे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करीत सांगितले. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘चित्रपटाचे डिजिटल प्रवाहातील भागीदार झी ५ तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड आहेत. याशिवाय नेटफ्लिक्स हिंदी याचाही समावेश यात आहे. झी सिनेमा हिंदी, स्टार प्लस तेलुगु, स्टार प्लस तमिळ, एशियननेट मल्याळम, स्टार कन्नड हे सॅटेलाईट भागीदार आहेत. डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर (परदेशी भाषा) देखील नेटफ्लिक्स (इंग्लिश, कोरियन, टर्किश और स्पॅनिश) असणार आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, आरआरआरचे निर्मात्यांनी चित्रपटाच्या डिजिटल, उपग्रह आणि इलेक्ट्रॉनिक हक्क विक्री करारावर सही केलेली आहे. बातमीनुसार हिंदीतील चित्रपटाचे थेट्रीकल रिलीज १४० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. चित्रपटाचे हक्क कोट्यावधी रुपयांना विकल्या गेल्याचे बोलले जात आहे. बातमीनुसार, झी ग्रुपला आरआरआर जाहीर झाल्यानंतर निर्मात्यांनी उपग्रह आणि डिजिटल हक्क (सर्व भाषा) ३२५ कोटींना विकले आहेत. मात्र निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारच्या हक्क विक्रीच्या मुद्द्यावर अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. अशा परिस्थितीत हा करार खरोखर निश्चित झाला आहे की नाही, हे अद्याप सांगता येणार नाही. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.