Take a fresh look at your lifestyle.

‘घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक’; अभिनेता नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केल्या दुःखी भावना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत गाजलेली अध्यात्मिक मालिका महाभारत यामध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज यांचा घटस्फोट झाला आहे. तब्बल १२ वर्षांच्या सुखी संसारानंतर पत्नी, आयएएस (IAS) स्मिता गाते यांच्यापासून नितीश विभक्त झाले आहेत. या दोघांनीही सप्टेंबर २०१९ मध्ये एकमेकांपासून वेगळ होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होते. यानंतर अलीकडेच एका मुलाखतीमध्ये नितीश यांनी पत्नीपासून विभक्त झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी घटस्फोट खूप वेदनादायक असल्याचे सांगितले.

घटस्फोटाबद्दल बोलताना नितीश म्हणाले कि, ‘होय हे खरे आहे, मी सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही का वेगळे झालो, त्यामागे काय कारण आहे, याबाबत मी भाष्य करणार नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. मी एवढेच म्हणू शकतो की कधीकधी घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असतो. कारण तुम्हाला कोलमडून पडलेल्या हृदयासोबत जगावे लागते.’ ‘खरंतर माझा या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आहे. पण, या बाबतीत मी कमनशिबी ठरलो.

पुढे म्हणाले कि, साधारणपणे लग्न तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी तडजोड न करणाऱ्या वृत्तीमुळे तर कधी भावनांच्या अभावामुळे असे होऊ शकते. कधीकधी अहंकार आणि फक्त स्वतःबद्दल विचार करणे देखील घटस्फोटाचे कारण असू शकते. ‘पण जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे आपल्या निर्णयामुळे मुलांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे.’

अभिनेता नितीश भारद्वाज यांची बीआर चोप्रा यांच्या महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर बॉलिवूड, मराठी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. शिवाय १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत जमशेदपूरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेत ते पोहोचले होते. नितीश यांनी १९९१ मध्ये मोनिषा पाटील यांच्यासोबत पहिले लग्न केले होते. यानंतर २००५ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. यानंतर २००९ मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता गाते यांच्याशी लग्न केले आणि ते दोघेही विभक्त होत आहेत.