Take a fresh look at your lifestyle.

डॉ. गिरीश ओक यांचे 50 वे नाटयपुष्प ‘38 कृष्ण व्हिला’ लवकरच रंगभूमीवर येणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर आता विविध विषयांचे भाष्य करणारी अनेक नाटकं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नाट्यगृहात दाखल झाली आहेत. अगदी विनोदी, गंभीर, सस्पेन्स अशा प्रत्येक शैलीतील नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आता सज्ज आहे. यानंतर आता दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे यांचे ‘38 कृष्ण व्हिला’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनय श्रेष्ठी अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि लेखिका तसेच अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे दिसत आहेत. डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे.

‘38 कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची दर्जेदार मेजवानी आहे. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ शनिवारी १९ मार्च २०२२ ला होणार आहे. ‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख?’ अशी या नाटकाची हटके टॅगलाइन आहे. मुखवट्याआड असणारा माणसाचा खरा- खोटा चेहरा याविषयी हे नाटक एका वेगळ्या शैलीत भाष्य करताना दिसेल. ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातून माणसाच्या एका चेहऱ्यामागचा दुसरा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.

डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे अभिनीत 38 कृष्ण व्हिला’ या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला दीनानाथ नाटयगृह पार्ले येथे दुपारी ४.१५ वाजता होणार आहे. तसेच रविवार २० मार्च २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन येथे प्रयोग सादर होणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली आहे. तर याचे सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. याशिवाय नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे.