Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या काळात हा अभिनेता वळला पुन्हा एकदा डॉक्टरकीकडे; रात्रंदिवस करतोय रुग्णांची सेवा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे थैमान घातले आहे. अश्यावेळी ऑक्सिजन, बेड्स आणि वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी लोक रस्त्यावर वणवण करत आहेत. अशातच देशातील परिस्थिती पाहता नुकताच अभिनेता म्हणून उभरू लागलेला मोगरा फुलला फेम आशिष गोखले इंडस्ट्री सोडून पुन्हा एकदा आपल्या डॉक्टरकीकडे वळला आहे. इतकेच नव्हे तर त्याने भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा संदेशही दिला आहे. सध्याच्या संकट काळात शांत राहून परिस्थितीचा सामना करण्यातच शहाणपण असून या तणावाचा मनावर आणि शरिरावर कसा विपरित परिणाम होतो, हे स्पष्ट केले आहे. देशाने कोरोनाविरुद्धचा लढा जोरदार सुरु असताना मूळचा डॉक्टर असलेला हा अभिनेता पुन्हा एकदा पॅशन बाजूला ठेवून प्रोफेशनकडे वळला आहे. डॉ. आशिष सध्या तारा फ्रॉम सातारा मालिका आणि गब्बर इज बॅक व लव्ह युवर फॅमिली या चित्रपटात झळकला आहे. सेक्शन ३७५ चे दिग्दर्शक मनीष गुप्ता यांच्या अद्याप नाव जाहीर न झालेल्या आगामी बिग बॅनर चित्रपटातून तसेच, लग्न कल्लोळ या मोहम्मद बर्मावाला यांच्या मराठी चित्रपटातही तो दिसणार आहे.

 

दरम्यान आशिष गोखले म्हणतोय की, तुम्ही वॉक घेण्यासाठी बाहेर पडला आहात आणि अचानक काही कुत्रे तुमच्यावर भुंकायला लागले, तुम्ही घाबरलात, असा विचार करा. तुमचा मेंदू त्वरित ही भीती ओळखतो आणि हायपोथॅलॅमस या ग्रंथीला कॉर्टिकोट्रोपिन-रिलिझिंग संप्रेरक (सीआरएच) स्त्रवण्याचा इशारा देतो. त्यानंतर सीआरएच तुमच्या पियुषिका ग्रंथींना अड्रीनोकॉर्टिकोट्रॉपिक संप्रेरकाचा (एसीटीएच) स्त्राव करण्याची आज्ञा देते, परिणामी अड्रीनॅलिन ग्रंथी कॉर्टिसोल हे संप्रेरक उत्पादित करतात, त्यालाच तणावाचे संप्रेरक किंव स्ट्रेस हार्मोन असे म्हणतात.

अशा वेळी अड्रीनॅलिन ग्रंथी अड्रीनॅलिन आणि कॉर्टीसोल आपल्या रक्तातील पेशींमध्ये सोडते. अड्रीनॅलिनमुळे आपल्या ह्रदयगतीवर परिणाम होतो, परिणामी छातीत धडधडणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. कॉर्टीसोलमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. कालांतराने, डोपामाईन, ऑक्सिटोसिन आणि एण्डॉर्फिन्स ही हॅप्पी हार्मोन्स असंतुलित होतात.

 

पुढे, या संपूर्ण प्रक्रियेला केवळ २ मिनिटे वगैरे लागू शकतात. आता विचार करा, हीच प्रक्रिया गेले वर्षभर आपल्या शरिरात सुरू असेल, तर कोरोनाबद्दलच्या या सततच्या भितीमुळेच आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. या समस्यांसाठी सकारात्मक विचार हा एक उत्तम उपाय आहे. मला हा आजार होणारच नाही, कोरोना विषाणू मला शिवणारच नाही, असे म्हणण्यापेक्षा मी कुणालाही कोरोनाचा बळी ठरू देणार नाही, असे म्हणणे जास्त महत्वाचे ठरेल. यामुळे तुमचा दृष्टीकोन बदलेल आणि तुमच्या जगण्याची पद्धतही बदलेल. यापेक्षा महत्वाचे म्हणजे, या विषाणूची पूर्ण माहिती करून घ्या आणि तुम्ही वाचत असलेल्या कोणत्याही मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, आपले हात स्वच्छ ठेवणे, आरोग्यपूर्ण आहार व व्यायाम नियमितपणे चालू ठेवणे या सरकारने आखून दिलेल्या काही दैनंदिन प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा.