Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळ्या ‘पांडू’ चित्रपटाच्या प्रीमियरला एकनाथ शिंदेंची हजेरी; कलाकारांनी मानले आभार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दादा कोंडकेंचा सदाबहार चित्रपट पांडू थोडा आधुनिकरीत्या हलके फुलके धमाल मनोरंजन करीत ३ डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण राज्यातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पांडू आणि महादू’ची भन्नाट कॉमेडी घेऊन मराठी मनोरंजन सृष्टीतील कॉमेडीचे महावीर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके दिसत आहे. काल अर्थात ३ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा प्रीमियर ठाणे येथील विवियाना मॉल येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थती होती. दरम्यान शिंदे यांनी चित्रपटातील कलाकार आणि टीमचे भरभरून कौतुक केले आणि चित्रपटाची मजादेखील लुटली. यानंतर कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत शिंदेंचे आभार मानले आहेत.

याबाबत एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, झी स्टुडिओजची निर्मित तसेच ठाणेकर विजू माने दिग्दर्शित #पांडू या सिनेमाचा प्रीमियर सोहळा काल ठाण्यातील विवीयाना मॉल येथे पार पडला. स्वर्गीय विनोद सम्राट लोकशाहीर दादा कोंडके यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याप्रसंगी उपस्थित राहून या सिनेमात काम करणाऱ्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ तसेच झी स्टुडियोजचे अश्विन पाटील यांचे अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या. यासमयी या सिनेमाचे दिग्दर्शक विजू माने, अभिनेता भाऊ कदम, अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री हेमांगी कवी, अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर तसेच पांडू सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

यानंतर कलाकारांनीसुद्धा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीची त्यांचे आभार मानले आहेत. चित्रपटातील उषा हे पात्र साकारणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या ट्विटरवर ट्विट करताना लिहिले आहे कि, धन्यवाद सर… वेळात वेळ काढून तुम्ही फक्त शुभेच्छाच दिल्या नाही तर संपुर्ण सिनेमा आमच्या टीम बरोबर पाहिला.. आणि आपले आशिर्वाद दिले. मनापासून धन्यावाद. ‘पांडू’ चित्रपटाच्या प्रिमिअरपासून संपूर्ण दिवसातील एक अन एक शो हाऊसफुल गेल्याने कलाकारांचा उत्साह आणि आनंद फार मोठा होता. तसेच अनेक कलाकारांनी चित्रपटाची मजा लुटली असून याबाबत भन्नाट प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.