Take a fresh look at your lifestyle.

देशभरातील चित्रपटगृहाच्या मालकांनी सलमान खानला पत्र लिहुन केली ‘ही’ विनंती

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. सलमानचे चित्रपट म्हणजे सुपरहिट हे समीकरण ठरलेलंच आहे. दरम्यान, ईदच्या (Eid) पार्श्वभूमीवर रिलीज होणारा आगामी चित्रपट राधे (Radhe) हा केवळ सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित करावा, अशी विनंती करणारे पत्र चित्रपट प्रदर्शन संघटनेने सलमान खान याला लिहिले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृह क्षेत्र अडचणींचा सामना करीत असून या क्षेत्राला मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहार, तेलंगणा, दिल्ली, डेहराडून आणि हैद्राबाद येथील संघटनांच्या या पत्रावर सह्या आहेत. ईदच्या निमित्ताने रिलीज होणारा हा चित्रपटदेखील आजपर्यंतच्या चित्रपटांप्रमाणेच मनोरंजनाचा धमाका ठरेल, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. हा चित्रपट ईदसारख्या महोत्सवाच्या काळात प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरेल आणि प्रेक्षकांचे पाय आपोआपच चित्रपटगृहाकडे वळतील. यामुळे कोरोनामुळे अडचणीत असलेल्या सिनेमागृहक्षेत्राला मोठा हातभार लागेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.

या पत्रात म्हणले आहे, की प्रिय सलमान खान, आशा आहे की या पत्रातून आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला माहिती आहेच की 2020 हे वर्ष कोट्यावधी देशवासीयांसह भारतीय चित्रपटांसाठी देखील अडचणींचे वर्ष ठरले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सिंगल स्क्रीन किंवा मल्टीप्लेक्स बंद असल्याने त्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जसे एखाद्या वाहनासाठी इंधन गरजेचे असते तसेच चित्रपटगृहांसाठी चित्रपट. त्यामुळे सातत्याने चित्रपट प्रदर्शित झाले नाही तर सिनेमागृहे चालवणे अशक्य आहे. एक दशकाहून अधिक काळ आपल्या चित्रपटांमुळे प्रेक्षक सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांकडे वळत होते. परंतु, आता आशयाचा अभाव असल्यामुळे प्रेक्षकांना आनंद मिळत नसल्याने ते आता या चित्रपटागृहांकडे पाठ फिरवत आहेत.

तुमच्या राधे :  युवर्स मोस्ट वाण्टेड भाई या आगामी चित्रपटामुळे देशभरातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांना संजीवनी मिळू शकते.  हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाला तर चित्रपटगृहांचे मालक आणि कर्मचाऱ्यांना अर्थिक पाठबळ तर मिळेल तसेच भविष्याबाबत एक आशेचा किरण देखील गवसेल. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतो की 2021 मधील ईदला प्रत्येक चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी योजना आखावी. यापेक्षा चांगली ईदी आम्हा चित्रपटगृह मालकांना अन्य काही असू शकत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.