Take a fresh look at your lifestyle.

पडद्यामागील जादूगार काळाच्या पडद्याआड; प्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी कलाविश्वातील अत्यंत प्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांचे निधन झाले आहे. हि बातमी ऐकताच संपूर्ण मनोरंजन सृष्टीला धक्काच बसला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. अखेर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि पडद्यामागील जादूगार कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. दरम्यान ते ७० वर्षाचे होते. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ १७७ हिंदी चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलं आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी लीलाधर सावंत यांनी चंदेरी दुनियेला रामराम केला होता आणि ते वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे स्थायिक झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर सावंत यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. इतकंच नव्हे, तर त्यांना दोनदा ब्रेन हेमरेज अटॅकदेखील आले होते. सोबतच त्यांची जीभ देखील निकामी झाली होती. दरम्यान या आजारपणामध्ये त्यांनी इतकी वर्षे मेहनत करून जमवलेला सर्व जमापुंजी खर्च झाली होती. त्यामुळेच एका मुलाखतीदरम्यान त्यांची पत्नी पुष्पा सावंत यांनी लीलाधर सावंत यांच्या सहकाऱ्यांना आपल्याला आर्थिक मदत हवी असल्याचे सांगितले होते आणि यासह त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहनदेखील केलं होतं.

कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांनी आपल्या आयुष्याची तब्बल २५ वर्ष कलाविश्वात कला दिग्दर्शक म्हणून पडद्यामागे काम केलं होतं. मात्र, १० वर्षांपूर्वीच त्यांनी हे क्षेत्र सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे वास्तव्यास आले होते. गेल्या २ वर्षांमध्ये लीलाधर सावंत यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. लॉकडाउनदरम्यान त्यांचे अतिशय हाल झाले होते. अखेर आता हाल अपेष्टा संपल्या आणि माणूस हरपला. कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांनी ‘सागर’, ‘हत्या’, ‘100 डेज’, ‘दिवाना’, ‘हद कर दी आपने’ अशा जवळपास १७७ चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. इतकेच नव्हे तर, त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि माणिकचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.