Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मास्टर शिवा शंकर अनंतात विलीन; दिग्गज कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ८०० हुन अधिक अव्वल चित्रपटांतील गाण्यांना तालबद्ध करणारे आणि अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या ठेक्यावर नाचवणारे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शिवा शंकर मास्टर यांनी रविवारी २८ नोव्हेंबर २०२१ रोजी जगाचा निरोप घेतला. दरम्यान ते ७२ वर्षांचे होते.काही दिवसांपूर्वी शिवा शंकर आणि त्यांच्या मोठ्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर हैदराबादेतील आयजी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळली आणि अखेर रविवारी रात्री त्यांची हि झुंज थांबली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मास्टरजींच्या निधनामुळे टॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवा शंकर यांना आर्थिक अडचणींनी अक्षरशः पिळून काढले होते. यामुळे त्यांना चांगले उपचार मिळू शकत नसल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष्य यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. शिवा शंकर यांच्या निधनानंतर सोनू सूदने ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, ‘ शिवशंकर मास्टर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण देवानं काही वेगळंच ठरवलं होतं. मास्तरजींना आपण सदैव लक्षात ठेवू. हे दु:ख सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटूंबियांना शक्ती देवो. चित्रपट सदैव तुमची आठवण ठेवेल सर.

प्रख्यात निर्माता आणि दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी देखील शिवा शंकर मास्टर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शिवशंकर मास्टर गरु यांचे निधन झाल्याचे दुःख वाटत आहे. मगधीरा चित्रपटासाठी त्यांच्यासोबत काम करणे हा एक संस्मरणीय अनुभव होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या संवेदना. शिवा शंकर मास्टर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी टॉलिवूड कलाकारांचा सागर लोटला होता. यामध्ये राजा मौली, चिरंजीवी, धनुष्य, सीवा कार्तिकेय, रामचरण अश्या कलाकारांचा समावेश होता.

शिवा शंकर यांनी चार दशकांपर्यंत टॉलिवूडची अनेक आयकॉनिक गाणी कोरिओग्राफ केली. तर १९७० सालामध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. साऊथच्या अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं आहे. मगधीरा या चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय झालेले प्रसिद्ध गाणे धीरा धीरा धीरा हे शिवा शंकर मास्टर यांनीच कोरिओग्राफ केलं होतं. या गाण्यासाठी त्यांना २०११ सालामध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यामुळे शिवा शंकर मास्टर यांचे निधन न पचविण्यासारखा धक्का असून मनोरंजन सृष्टी त्यांना नेहमी स्मरणात ठेवेल.