Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडवर पुन्हा पसरली शोककळा; प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनामूळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबई येथे राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते कोरोनाने ग्रासले होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कोरोनाशी लढत दिली. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान जॉनी लाल यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान ते घरीच आयसोलेट राहून उपचार घेत होते. मात्र अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मृत असल्याचे घोषित केले. जॉनी लाल यांनी ‘रहना है तेरे दिल में’ आणि ‘मुझे कुछ कहना है’ यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अभिनेता आर. माधवन आणि अभिनेता तुषार कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

अभिनेता आर. माधवन याने ट्विट केले की, ‘विघ्न सुरुच असून ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाचे डीओपी (कॅमेरामन) जॉनी लाल यांचे निधन झाले आहे. तुम्ही एक अद्भूत व्यक्ती होतात. रेस्ट इन पीस सर. तुमचा विनम्र स्वभाव, दयाळूपणा आणि प्रतिभा नेहमीच आठवणीत राहील’. तर अभिनेता तुषार कपूर याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘रेस्ट इन पीस जॉनी सर! ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाला तुम्ही अशा पद्धतीने शूट केले की तो आजही एकदम फ्रेश वाटतो. माझ्या पहिल्या चित्रपटाला एक सुंदर, तरुण, नैसर्गिक लूक देण्यासाठी खूप खूप धन्यवाद’.

तर सतीश कौशिक यांनीही ट्विट करत जॉनी लाल यांना श्रद्धांजली दिली आहे. संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. इतकेच नव्हे तर याचा जोरदार फटका बॉलिवूड सृष्टीला लागला आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाने नुसता कहर माजवला आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबविण्यात आले असून आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या. तर राज्यातील चित्रपट ग्रहण पुन्हा एकदा टाळे लावण्यात आले आहे. दरम्यान बॉलिवूड सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी अन्य कारणांनी देखील जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यामुळे जॉनी लाल यांचे निधन होणे म्हणजे बॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्काच आहे.