लोककवी, ज्येष्ठ गीतकार हरेंद्र जाधव काळाच्या पडद्याआड; भारतीय रिपब्लिक अध्यक्ष रामदास आठवलेंनी वाहिली श्रद्धांजली
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचे वृद्धापकाळाने मुंबईतील सानपाडा येथे राहत्याघरी निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान ते ८८ वर्षाचे होते. ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’, ‘माझ्या नवऱयाने सोडलीया दारू’, ‘पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’, ‘आता तरी देवा मला पावशील का’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. यामुळे त्यांनी अंथरून धरले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. अखेर काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पेक्षाने शिक्षक होते. मात्र ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी आयुष्यातील पहिले गाणे लिहिले होते.
भारतीय रिपब्लिकन राजकीय पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. रामदास आठवले यांनी गीतकार हरेंद्र जाधव याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, लोककवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा गीतसम्राट हरपला. श्री हरेंद्र जाधव यांनी भीमगीते ; भावगीते; लोकगीते लिहून मनोरंजनातून जन प्रबोधन केले. त्यांनी 10 हजारांहून अधिक गीते लिहिली. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी अजरामर लोकप्रिय गाणी आहेत. भीमगीतांचा मळा फुलविणारे लोककवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा गीतसम्राट हरपला आहे. दिवंगत ज्येष्ठ कवी हरेंद्र जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मूळचे नाशिक जिल्ह्यातील असणारे हरेंद्र जाधव हे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ श्रेष्ठ गीतकार आहेत. आंबेडकरी चळवळीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जलसाकारांनी साथ दिली. त्याकाळच्या जलसाकारांचा प्रबोधनपर गीतांचा वारसा हरेंद्र जाधव यांना लाभला.
कवी हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायचा मळा हे सुप्रसिद्ध गीत लिहिले. त्यासोबत त्यांनी अनेक लोकप्रिय भावगीते, भक्तिगीते, लोकगीते लिहिली. ज्येष्ठ कवी गीतकार हरेंद्र जाधव यांचे काव्याचे वैचारिक अधिष्ठान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार होता. त्यातून त्यांनी अनेक भीमगिते लिहिली. लोककवी गीतकार प्रबोधनकार म्हणून हरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधानाने आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधी ही भरून येऊ शकत नाही.
एक शांत, संयमी, संवेदनशील थोर विचारवंत साहित्यिक, कवी, अख्या जगाला आपल्या लेखणीने प्रेरणा देणारे. आंबेडकरी चळवळीला बळ देणारे लोककवी म्हणून हरेंद्र जाधव यांची ख्याती होती. हरेंद्र जाधव यांनी आपल्या कारकिर्दीत १० हजारांहून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यांची अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवाल यांसारख्या दिग्गज गायक- गायिकांपासून अगदी बेला सुलाखे, साधना सरगम यांनीही हरेंद्र जाधव यांनी रचलेली गाणी गायली आहेत. हरेंद्र जाधव यांच्या निधनाने हळहळलेल्या शाहीर नंदेश उमप यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करीत जाधव याना श्रद्धांजली वाहिली आहे.