Take a fresh look at your lifestyle.

प्रसिध्द साहित्यिक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी साहित्य विश्वातून मोठी दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध साहित्यिक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. दरम्यान ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अरुण जाखडे हे पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक होते. मराठी ग्रंथ प्रकाशनाच्या विश्वात त्यांचा मोठा नावलौकिक होता. ते स्वतः एक लेखक असून त्यांची साहित्य अत्यंत लोकप्रिय आहेत. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण जाखडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. अरुण जाखडे यांच्या निधनाच्या बातमीला ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक धनंजय चिंचोलीकर यांनी दुजोरा दिला आहे. शिवाय माध्यमांशी बोलताना त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. माध्यामांशी बोलताना ते म्हणाले की, ही बातमी खूपच धक्कादायक आहे. परवाच त्यांचा फोन झाला होता. त्यांना पायाचं दुखणं होतं पण त्यातून ते सावरले होते. अफाट संपर्क असलेला हा माणूस. त्यांचा गोतावळ खूप मोठा होता. त्यांनी अत्यंत ताकदीची पुस्तके काढली. खासगी बैठकीत तर त्यांच्याकडे प्रचंड किस्से असायचे आणि ते सांगण्याची शैलीही त्यांची खूप रंजक होती.

 

पुढे म्हणाले, लेखक म्हणूनही ते ताकदवान होते. लेखन, प्रकाशन, तीन-तीन दिवाळी अंक, असा त्यांचा प्रचंड व्याप होता. त्यांनी माझं ‘न घेतलेल्या मुलाखती’ हे पुस्तक काढलं. दरवर्षी दिवाळी अंकासाठी त्यांचा हमखास फोन यायचा. परवाच फोन झाला, आमचा विषय होता शामराव (दिवंगत श्याम देशपांडे, राजहंस प्रकाशन). मी आणि शामराव पुण्याला गेलो की कायम त्यांच्याकडे जायचो आणि ते इकडे औरंगाबादला आले की आम्ही दिवसभर सोबत असायचो. जवळपास २० वर्षांपासून आमचा संपर्क होता. फोनवर ते म्हणाले की, शाम गेल्याने आता औरंगाबादला यावेसे वाटत नाही. त्यानंतर आता हे स्वतः देखील गेले. त्यामुळे ही बातमी ऐकून मला खूपच धक्का लागला आहे.”

 

मराठी ग्रंथ प्रकाशनाच्या विश्वात अरुण जाखडे हे एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते. शिवाय त्यांनी विविध वर्तमानपत्रांतून ५ वर्षांहून अधिक काळ लेखन केले आहे. ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ या खास साहित्यिक दिवाळी अंकांसाठी त्यांना ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळातून शोकपर प्रतिक्रिया उमटत आहेत.