Take a fresh look at your lifestyle.

साऊथ सिनेइंडस्ट्रीवर शोककळा; प्रसिद्ध गायिकेचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील संगीत सृष्टीतून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येतेय. मल्याळम, तमिळ, तेलुगु आणि कन्नड यासारख्या दाक्षिणात्य भाषांमध्ये आपल्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटातील गाण्यांना आपला सुमधुर आवाज देणारी गायिका संगीता साजिथ यांचे रविवारी अर्थात दिनांक २२ मे २०२२ रोजी निधन झालं. त्यांचं निधन तिरुवनंतपुरम येथे झाले. दरम्यान त्या ४६ वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गायिका संगीता साजिथ या किडनीशी संबंधित आजाराने गेल्या बऱ्याच काळापासून त्रस्त होत्या. अखेर हा त्रास थांबला आणि श्वासही. त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे समजताच संगीत कला क्षेत्रात दुःखाची लाट उसळली आहे.

प्रसिद्ध गायिका संगीता साजिथ यांच्या निधनावर अनेक प्रतिभावान कलाकार आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी दुःख व्यक्त केले आहे. इतकेच नव्हे तर केरळच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनीही त्यांच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केला आहे. तर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या निधनाचा बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि त्यांचे चाहते विविध पोस्ट च्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

माहितीनुसार, गायिका संगीता साजिथ या मूळ केरळच्या आहेत आणि त्यांनी एसए चंद्रशेखर यांच्या १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नालैया थेरपू’ या चित्रपटातून तमिळ पार्श्वगायनात पदार्पण केले होते. याशिवाय त्यांनी प्रभू देवाच्या ‘मिस्टर रोमियो’ चित्रपटासाठी प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले ‘थन्नेराई कधालिकुम’ हे गाणे देखील गेले होते. या गाण्याने १९९० चा काळ अक्षरशः गाजवला होता. पुढे १९९८ साली मल्याळम चित्रपट ‘एन्नू स्वांथम जानकीकुट्टी’साठी कैथापराम दामोदरन नंबूथिरी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अम्बिली पूवत्तम पोन्नरुली’ या गाण्यालाही त्यांनी आवाज दिला होता. हे गाणे देखील त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.