Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्रीचा भीषण कार अपघातात मृत्यू; 26′ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डी क्रूझ हीचे दुर्दैवी अपघातात निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमधील गचिबोली या परिसरात हा अपघात झाला. दरम्यान गायत्री हि अवघ्या 26 वर्षांची होती. दिनांक १८ मार्च २०२२ रोजी होळी सेलिब्रेशननंतर मित्रासोबत घरी जाताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी गायत्रीचा मित्र राठोड हा गाडी चालवत होता. अचानक त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली आणि उलटली. यावेळी गायत्रीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिचा मित्र राठोड याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं.

या भीषण अपघातात एका पादचारी महिलेचाही जागीच मृत्यू झाला आहे. ज्या वेळी गायत्री आणि राठोड यांची कार उलटली त्यावेळी ३८ वर्षीय महिला त्याखाली चिरडली गेली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. गायत्री एक सोशल मीडिया फेम होती. यामुळे तिच्या निधनाने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे ती नेहमीच चर्चेत असायची. तेलुगू इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे गायत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.

तेलुगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डी क्रूझ ही मूळ तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातील लंकाला गावातील होती. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘जलसा रायडू’ नावाच्या यूट्यूब चॅनेलद्वारे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. युट्यूब व्हिडीओजवरून गायत्रीला प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने तेलुगू वेब सीरिजमध्ये काम केले. ‘मॅडम सर मॅडम अंटे’ या वेब सीरिजमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. यानंतर काही शॉर्ट फिल्म्समध्येही तिने काम केलं आहे. अभिनेत्री सुरेखा वाणी यांनी इंस्टा पोस्ट लिहित गायत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले कि, ‘मला अजूनही विश्वास बसत नाही. गायत्री, तू परत ये, आपल्याला एकत्र बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. ही तुझी जाण्याची वेळ योग्य नव्हती’.