Take a fresh look at your lifestyle.

स्वत:च्या रक्ताने बनवले ‘द काश्मिर फाईल्स’चे पोस्टर; फोटो पाहून अग्निहोत्रींनी केले चाहत्यांना आवाहन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच चर्चेत आहे. कारण यात सत्य घटनेवर भाष्य केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या चित्रपटासाठी अनेक पोस्ट रोज शेअर केल्या जात आहेत. यात कोणी या चित्रपटाचे कौतुक करते तर कुणी विरोध. अनेकांनी चित्रपटातील घटनांविषयी आपले मत व्यक्त करताना विविध प्रतिक्रिया आणि विविध माध्यमातून पोस्ट शेअर केल्या आहेत. या सगळ्यामध्ये एका चाहतीने चक्क तिच्या रक्ताने पोस्टर बनविल्याचे पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हळहळले आहेत. हा फोटो शेअर करीत त्यांनी लोकांना आवाहन केले आहे.

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हि पोस्ट केली आहे. अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘OMG! अविश्वसनीय. मला काय बोलावे ते कळत नाही आहे. मंजू सोनीजी यांचे आभार कसे मानावे. तुमचे खूप खूप आभार. जर कोणी त्यांना ओळखत असेल तर कृपया त्यांचा नंबर मला DM मध्ये शेअर करा. असे ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट पोस्ट केले आहे.

आणखी एक ट्वीट करत विवेक अग्निहोत्री म्हणाले कि, मी तुमच्या भावनांची कदर करतो. पण कोणत्याही व्यक्तीने, लोकांनी असे कोणतेही कृत्य करु नये अशी मी गंभीरपणे विनंती करतो. ही चांगली गोष्ट नाही. मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणारी आर्टिस्ट मंजू सोनी यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या रक्ताने हे पोस्टर बनवले आहे. द काश्मीर फाईल्स च्या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक कलाकारांच्या चेहऱ्याचे चित्र आपल्या रक्ताने त्यांनी काढले आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.