बाप, लेक का राज्य?; प्रिया बापटच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’चा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट हिची अत्यंत गाजलेली वेबसीरिज म्हणजे सिटी ऑफ ड्रिम्स. आता या वेबसिरीजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात येणारे ट्विस्ट, दमदार अभिनय आणि राजकीय खेळीचे नाट्य यामुळे पहिला सीझन तुफान गाजला होता. त्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत होते आणि नुकताच आगामी सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचली आहे. सिटी ऑफ ड्रिम्स २ ही वेब सीरिज ३० जुलैला हॉटस्टारवर पहायला मिळणार आहे.
या वेब सीरिजच्या पहिल्या भागात भाऊ बहिणीत राजकीय रिंगणाची लढत सुरु होती. मात्र या दुसऱ्या सीझनमध्ये लेक आणि वडिलांमध्ये राजकारणाचा खेळ कसा रंगतो? आणि अखेर यात बाजी मारणार तरी कोण असे काहीसे राजकीय रिंगणात अडकलेल्या नातेसंबंधाचे कथानक दाखवण्यात येणार आहे. शेवटी खुर्चीच्या लालसेपुढे कोणत्याही नात्याला अर्थ नसतो आणि एखादा राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे दाखवले आहे. इतकेच काय तर सत्तेपुढे नाती विसरलेल्या वडिलांना त्यांची मुलगी कशी टक्कर देते हे या सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या पहिल्या सीझनच्या शेवटी राजकीय पार्टीची भव्य बैठक दाखवली होती. जगदीश दिल्लीसाठी योजना आखतो आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतो. दरम्यान, पौर्णिमाला हल्ल्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे पहिल्या सीझनमध्ये शिल्लक राहिलेली ही कहाणी सीझन २ मध्ये पुढे अशीच सुरू राहणार आहे. या सीरिजमध्ये प्रिया बापटसोबत सचिन पिळगांवकर, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. शिवाय एजाज खान आणि सुशांत सिंग हे कलाकारदेखील यात झळकणार आहेत.