Take a fresh look at your lifestyle.

RSS’ची बदनामी जावेद अख्तरांना भोवणार?; दंडाधिकारी न्यायालयात आणखी एक तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अश्याच एका वक्तव्यामुळे RSS समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात त्यांच्याविरोधात कलम ४९९ – मानहानी, ५०० – बदनामी अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. RSSची प्रतिष्ठा खराब करणे, मुद्दाम हेतुपूर्वक बदनामीकारक काल्पनिक विधाने करणे याप्रकरणी जावेद अख्तरांवर फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. शिवाय त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही म्हटले होते. एका मुलाखतीत अख्तर म्हणाले की, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.

पुढे, ‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे.’ याच वक्तव्यांवर बोट ठेवत जावेद अख्तर यांच्यावर पुन्हा एकदा फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.