Take a fresh look at your lifestyle.

आपडी थापडी! श्रेयस तळपदेच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात; पहा पहिली झलक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे सध्या छोटा पडद्यावर कमाल करताना दिसतोय. झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मराठी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ यामधून तो पुन्हा एकदा रसिकांच्या घराघरात दिसतोय. पण यानंतर आता लवकरच तो पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. गुरुवारी २७ जानेवारीला श्रेयसच्या ४६ वा वाढदिवस झाला. यानिमित्त त्याने चाहत्यांसाठी त्याच्या आगामी चित्रपटाची झलक शेअर केली आहे. या चित्रपटाचे नाव आपडी थापडी असे असून त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

‘आपडी थापडी’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी येणार आहे. याचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला असून श्रेयसने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस एका बापाची भूमिका साकारणार असल्याचे या प्रोमोमधून समजत आहे. शिवाय गुरुवारपासून ‘आपडी थापडी’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ‘आपडी थापडी’ या चित्रपटामध्ये श्रेयससोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे, नवीन प्रभाकर, नंदू माधव, संदीप पाठक, खुशी हजारे असे कलाकार दिसणार आहेत.

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर श्रेयसने आपडी थापडी चित्रपटाचा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपले प्रेम आणि आशिर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो…हीच बाप्पा चरणी प्रार्थना.’ श्रेयसच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, साधारण १० ते १२ वर्षांनंतर तो मराठी मालिकेत झळकतो आहे. यापूर्वी त्याने ‘आभाळमाया’, ‘अवंतिका’ या मालका गाजवल्या होत्या. यानंतर बॉलिवूडमध्ये ‘इक्बाल’, ‘गोलमाल’ तर मराठीमध्ये पछाडलेला, बाजी यासारखे कमाल चित्रपट त्याने केले आहेत.