Take a fresh look at your lifestyle.

‘मी वसंतराव’ चित्रपटाच्या संगीतमय प्रवासाची पहिली झलक चर्चेत; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रतिभाशाली शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जीवनाचा संगीतमय प्रवास ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक जगप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते सादर करण्यात आली. यानंतर हि पहिली झलक प्रेक्षकांना अतिशय भावल्याचे दिसून येत आहे. लोकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता आहे. ”माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल”, असं ठामपणे सांगणाऱ्या पंडीत वसंतराव यांचे नातू राहुल देशपांडे यांच्या गायकीची एक परंपरा आपल्यासमोर यातून सादर झाली आहे.

या चित्रपटाविषयी उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात कि, पं वसंतराव देशपांडे हे कलाक्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आहे. मुळात त्यांच्यात आणि माझ्यात भावनिक ऋणानुबंध आहेत. साधारण साडे तीन वर्षांचा असल्यापासून मी त्यांना पाहात आलो आहे. वयाच्या आठव्या वर्षी, त्यांच्याच सांगण्यानुसार मी त्यांना एका कार्यक्रमात तबल्याची साथ दिली होती. मी नशिबवान आहे की, इतक्या महान व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात मला राहता आले. त्यांची शेवटची मैफिलही माझ्यासोबतच होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या गायकीच्या माध्यमातून त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मी राहुलजींचा खूप आभारी आहे, त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून वसंतरावांना अजरामर केले आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, सुरेल संगीताचा ऐतिहासिक प्रवास दर्शविणारा ‘मी वसंतराव’ हा चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर निर्मित या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. शिवाय या चित्रपटाला संगीतही राहुल देशपांडे यांनीच दिले आहे. तसेच राहुल यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहे.