हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ या सिनेमावरून प्रचंड वाद सुरु आहेत. अशातच अनेक ठिकाणी या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग केलं जात आहे. असाच स्क्रीनिंग पुण्यातील FTII मध्ये देखील आयोजित करण्यात आलं होतं. पण यासाठी विदयार्थ्यांच्या एका गटाचा सिनेमाला कडाडून विरोध होता. या सिनेमाचं स्क्रीनिंग थांबवण्यासाठी विद्यार्थी आक्रमक देखील झाले आणि त्यांनी एफटीआयच्या परिसरात मोठं आंदोलन पुकारलं. दरम्यान विदयार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचं स्क्रीनिंग पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरु ठेवण्यात आलं.
आज शनिवार, दिनांक २० मे २०२३ रोजी भारतीय चित्रपट आणि दूरचित्राणी संस्थेमध्ये (FTII) सकाळी ९ वाजता ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग सुरु झाले. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने या सिनेमाच्या स्क्रिनिंगला कडाडून विरोध केला. मुख्य म्हणजे FTII’मध्ये मागील काही दिवसांपासून शैक्षणिक कारणास्तव विद्यार्थ्यांचे गेल्या ५ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाचा आज चाळीसावा दिवस. दरम्यान ‘द केरला स्टोरी’चे स्क्रीनिंग मध्ये आल्याने आंदोलनाला वेगळेच वळण लागले. पण विद्यार्थ्यांनी या स्क्रीनिंगलाही विरोध करूनही पूर्ण पोलीस बंदोबस्तात स्क्रीनिंग पार पडले.
यावेळी शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज या स्क्रिनिंगसाठी उपस्थित होते. ‘द केरला स्टोरी’ या सिनेमानं सर्व स्तरावर चर्चा मिळवली आहे. अगदी राजकीय पक्षदेखील या सिनेमासाठी मैदानात शंख फुंकताना दिसले. या सिनेमाने रिलीजपासून जवळपास १५० करोड इतकी कमाई केली आहे आणि अजूनही चालूच आहे. या सिनेमातील कथेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. पण सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन रिअल लाइफमधील पीडित धर्मांतर झालेल्या महिलांना कॅमेऱ्यासमोर आणले आणि सगळ्यांनाच थक्क केले. असं असलं तरी सिनेमाविरोधात रोज एक नवा वाद समोर येताना दिसत आहे.
Discussion about this post