हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील छोट्या पडद्यावर सुरु असलेली ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या मोठ्या अडचणीत सापडली असल्याचे समोर येत आहे. मालिकेतील काही चित्रित दृश्यांवर आक्षेप घेत, एलजीबीटीक्यु कम्युनिटीने या मालिकेच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे कळत आहे. ‘येस वी एक्झिस्ट’ नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरून याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मालिकेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे या पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे. मात्र अद्याप या मालिकेच्या निर्मात्यांनी किंवा संबंधित चॅनलने यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया वा माहिती माध्यमांमध्ये दिलेली नाही.
विषय असा कि, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम अर्थात अभिनेता हर्षद अटकरी एका पाककला स्पर्धेत भाग घेतो. या स्पर्धेत वेगवेगळे स्पर्धक सहभागी होतात आणि यातला एक स्पर्धक ‘सॅन्डी’ हा समलैंगिक आहे. ही भूमिका अभिनेता अजिंक्य पितळे याने साकारली होती. याच सॅन्डी व जीजी आक्कावर चित्रीत झालेल्या काही दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती आहे. जीजी आक्का सॅन्डीला त्याच्या राहणीमानावरून हिणवतात, असे वागू नकोस असा सल्ला देतात. इतकेच नाही तर त्याला जिममध्ये जाऊन शरीर कमावण्याचाही सल्ला देतात, यावर ‘येस वी एक्झिस्ट’ने आक्षेप घेत मालिकेविरुद्ध बंड पुकारत एफआयआर दाखल केली आहे.
मुलीच्या जन्माप्रमाणेच तिचे शिक्षण हा समाजातील अतिशय मोठा आणि चर्चेचा विषय आहे. तसे पाहता आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर अनेको क्षेत्रात आज स्त्रियांचे वर्चस्व आहे. असे जरी पाहायला मिळत असले तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावे अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून आजही केली जाते.
मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणे आणि पूर्ण करायला साथ देणे म्हणजेच खरा संसार. हे समीकरण फार कमी जणांच्या सद्सद्विवेक बुद्धीला समजते. एकमेकांत मिसळून जात फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना आकार देणारी व स्वप्न पूर्ण करणा-या संसाराची आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, हर्षद अटकरी, आदिती देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.