Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता नाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार जाहीर; अभिनेत्री निवेदिता जोशी, संगीतकार कौशल इनामदार यांचाही होणार सन्मान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा २०२१ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ याना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्काराचे सन्मान जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी ७ डिसेंबर २०२१ रोजी पत्रकार परिषद घेत या पुरस्कारांची घोषणा केली आहे. येत्या मंगळवारी अर्थात दिनांक १४ डिसेंबर रोजी ग.दि.माडगूळकर यांची ४४’वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे याच दिवशी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांना ‘गदिमा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

आपण सारेच जाणतो कि, गेल्या अनेक वर्षांपासून नाम फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर हे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या समवेत संपूर्ण राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेत त्या गावांना सढळ हस्ते कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत केली आहे. याच पार्श्वभूमीवर नानांना प्रतिष्ठित गदिमा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ या एक उत्तम अभिनेत्री आणि तितक्याच उत्तम गृहिणी आहेत हे सारेच जाणतात. म्हणूनच गदिमा यांच्यातर्फे निवेदिता सराफ यांना गृहिणी सखी सचिव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

याशिवाय गदिमा चैत्रबन पुरस्कार हा ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच स्व. विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा विद्या प्रज्ञा पुरस्कार हा गायिका रश्मी मोघे यांना देऊन त्यांचा सन्मान केला जाईल.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात येत्या मंगळवारी १४ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल. या पुरस्काराचे स्वरुप २१ हजार रुपये सह सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचे असेल.