हँडसम गश्मीर आणि ग्लॅमरस मृण्मयीचा ‘विशू’ प्रदर्शनास सज्ज; 8 एप्रिलला होणार रिलीज
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेमाची एक अनोखी कहाणी घेऊन येत्या ८ एप्रिल २०२२ रोजी अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘विशू’. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर रिलीज केले होते.तेव्हापासूनच या चित्रपटा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यानंतर आता हा चित्रपट कधी रिलीज होणार त्याची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हँडसम गश्मीर आणि ग्लॅमरस मृण्मयी पहिल्यांदाच एकत्र येत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता आहे.
श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र ‘विशू’च्या माध्यमातून निसर्गरम्य कोकण आणि तिथे हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी पाहायला मिळेल.
मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित या सिनेमात गश्मीर, मृण्मयी यांच्यासह ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर या कलाकारांच्यादेखील अन्य प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची खास बाब म्हणजे याचे जास्तीत जास्त चित्रीकरण हे कोकणात केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे नयनरम्य कोकणाचे दर्शन घेता येईल.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात कि, ‘’हा एक कौटुंबिक चित्रपट असून ‘विशू’मधून एक गोड प्रेमकहाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटाविषयी मी जास्त काही बोलणार नाही फक्त एकच सांगेन की, काही गोष्टींची जाणीव आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ या चित्रपटाची निर्मिती बाबू कृष्णा भोईर यांची आहे. तर मयूर मधुकर शिंदे यांनी कथालेखन केले आहे आणि ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाची पटकथा तसेच संवाद लिहिले आहेत. छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे. तर ऋषिकेश कामेरकर यांनी संगीत दिले आहे आणि मंगेश कांगणे यांनी गाणी गायली आहेत.