Take a fresh look at your lifestyle.

‘गोलमाल’मधील रत्ना विसरणे शक्य नाही; अभिनेत्री मंजू सिंग यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री व निर्मात्या मंजू सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. या वृत्ताला गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी दुजोरा दिला आहे. स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना देत शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मंजू सिंग यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या मुंबईत राहत होत्या. गोलमाल चित्रपटातील लक्षवेधी भूमिकेमुळे त्यांची अशी एक वेगळी ओळख होतीच. शिवाय त्या स्वतः एक निर्मात्या होत्या. मंजू यांचे निधन हि चित्रपट सृष्टीची हानी आहे. स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून भावूक ट्वीट करत मंजू याना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘मंजू सिंग जी आता राहिल्या नाहीत! दूरदर्शनसाठी ‘स्वराज’ हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी ‘एक कहानी’, ‘शो टाइम’ इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जींच्या ‘गोलमाल’ चित्रपटातील रत्ना हमारी प्यारी मंजू जी, तुमचं प्रेम कसे विसरता येईल.. गुडबाय!’

स्वानंद यांच्या या ट्विटवर अनेक युजरने मंजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर अनेकांनी गोलमाल’ मधील रत्ना विसरणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मंजू सिंग यांनी १९८०’च्या सुरुवातीला ‘शो थीम’ या पहिल्या प्रायोजित कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर डेब्यू केले. त्यांनंतर दूरदर्शनसाठी मालिका, लहान मुलांचे कार्यक्रम, आध्यात्मिक ते सक्रियता आणि इतर अर्थपूर्ण विषयांपर्यंत अनेक संस्मरणीय दूरदर्शन कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. ‘एक कहानी’, ‘स्वराज’, ‘अधिकार’ यामध्ये त्यांनी काम केले आहे. मंजू सिंग यांनी १९७९ साली गोलमाल चित्रपटात अभिनेता अमोल पालेकर यांच्या धाकट्या बहिणीची अर्थात ‘रत्ना’ची भूमिका साकारली होती. याशिवायदेखील अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
RIP आदरणीय मंजू सिंग