Take a fresh look at your lifestyle.

लोककलावंतांसाठी आनंदाची बातमी; येत्या 1 फेब्रुवारीपासून राज्यात तमाशाला परवानगी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणी आणि तमाशा फड हे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचे असे घटक आहेत ज्यांशिवाय आपल्या कलेचा वारसा पूर्ण होत नाही. यामुळे राज्यात ठिकठिकाणी या कलेचे सादरीकरण करून पुढील प्रत्येक पिढीमध्ये या संस्कृतीचे बीज रोवले जाते. पण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोना विषाणूचा वाढता थैमान पाहता राज्यातील लोककलावंतांना आपली कला सादर करता येत नव्हती. यामुळे अनेकांना हलाखीचे दिवसदेखील पाहावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांनी अनेक कलावंतांना आर्थिक संकटात टाकले. यानंतर आता लोककलावंतांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे येत्या १ फेब्रुवारीपासून राज्य सरकारने राज्यात तमाशा सादरीकरणाला परवानगी दिली आहे. या बातमीमुळे राज्यभर कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surekha Punekar (@surekhapunekar)

प्रसिध्द लावणीसम्राज्ञी लावण्यवती सुरेखा पुणेकर यांनीही याविषयी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये सुरेखाताई यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, कोरोना महामारी आणि त्यामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन तसंच अनेक गोष्टींसाठी निर्बंध घालण्यात आल्याने याचा मोठा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे तमाशा कलावंतही अडचणीत आले होते. मात्र, आता या कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात १ फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. तमाशा कलावंतना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फंडातून १ कोटींची मदत केल्याबद्दल आणि १ फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर आभार मानले आहेत. आमदार अतुल बेनके यांनी शासन दरबारी कलाकरांचा विषय सतत मांडला त्यांचे खुप खुप आभार!

 

तमाशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला हा एक लोकनाट्याचा प्रकार आहे. ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा असेही तमाशाचे विविध बहुरंगी प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या सादरीकरणाची पद्धत, बतावणी असे वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनासाठी ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते. असा हा तमाशा मराठी संस्कृतीचे लेणे जपत संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.