Take a fresh look at your lifestyle.

हा ठरला नेटफ्लिक्स वरील बहुचर्चित चित्रपट; “पगलैट”- गोष्ट वेडेपणातील शहाणपणाची!

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत कित्येक बॉलीवूड चित्रपटांमध्ये विधवांच्या समस्या विविध रूपात मांडण्यात आल्या. मात्र आजच्या युगातील पुढारलेल्या शुद्ध विचारांची मुलगी विधवा झाली तर काय?, याबाबतचा विचार लेखक, दिग्दर्शक उमेश बिश्त यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीपेक्षा वेगळे कथानक, तसेच गंभीर विषय आणि संगीत व कलाकारांच्या अभिनयामुळं हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरतो. मुलगी मुद्देसूद बोलायला लागल्यास तिला वेडी म्हणजेच ‘पगलैट’ ठरवण्याच्या समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित हा चित्रपट ताशेरे ओढताना दिसतो.

या चित्रपटाची कथा एका तरुण विधवेवर आधारलेली आहे. या मुख्य पात्राचे नाव संध्या गिरी असे आहे. हि भूमिका सान्या मल्होत्रा बजावताना दिसतेय. लग्नानंतर केवळ पाच महिन्यांत पतीचे निधन झाले असता, गंभीर प्रसंगामध्ये थोडंही रडू न आलेल्या संध्याची मानसिकता समजू न शकणाऱ्या समाजाची भूमिका या चित्रपटांत दर्शविली आहे. आपल्या पुरोगामी विचारांवर ठाम राहत संघर्ष करणाऱ्या युवतीची हि कहाणी सध्या क्रिटिक्स रिव्ह्यू मिळविण्यात व्यग्र आहे.

या चित्रपटात संध्याला पाच महिन्यांच्या संसारात आपल्या पतीनं प्रेमाची वागणूक का दिली नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. ते उत्तर तिला तिच्या पतीच्या ऑफिसमधील सहकारी आकांक्षाकडं असल्याची अशी खात्री पटते आणि ती शोध घेऊ लागते. एकीकडडे नातेवाइकांची धार्मिक विधी पूर्ण करण्याची गडबड सुरु असते. त्यामुळे निर्माण होणारे वाद, हेवेदावे, इस्टेटीचे प्रश्न व त्याच्या जोडीला या तेरा दिवसांत संध्याला लागलेला स्वतःचा शोध सारंच प्रेक्षकांना खिळवणारं आहे.

चित्रपटाचं कथानक अत्यंत वेगळे असल्याने काही मोजक्या शब्दात सांगणे कठीण आहे. तसे पाहता महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाबाबत बोलणाऱ्या समाजाची हि दोन पदरी भूमिका निश्चितच मांडणे सोप्पे नव्हते. मात्र लेखकाची लेखन शैली तसेच दिग्दर्शन, कलाकारांचा वास्तवदर्शी अभिनय आणि संगीताने साऱ्यांनाच विचार करण्यास भाग पाडले आहे.

अभिनय सृष्टीतील टप्प्यावर सान्याला एका अनोख्या भूमिकेचे मोठे आव्हान मिळाले आणि तिने ते स्वीकारून उत्तमरीत्या पेलले आहे. नवऱ्याच्या मृत्यूमुळं गोंधळलेली, प्रथम बंडखोरी करू पाहणारी व नंतर स्वतःचं ध्येय उमगल्यानंतर त्या दिशेनं प्रवास करणारी संध्या तिनं जिवंत केली आहे. या चित्रटपटांत सान्या मल्होत्रासोबत, आशुतोष राणा, शिबा चढ्ढा, सयानी गुप्ता, रघुवीर यादव, राजेश तेलंग असे अनेक विविध कलाकार दिसत आहेत. या सर्वच कलाकारांनी साकारलेल्या लहान भूमिका देखील या चित्रपटाचा प्राण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.