Take a fresh look at your lifestyle.

फातिमा बेगम काळाच्या पडद्याआड; ‘गुलाबो सिताबो’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे ८९व्या वर्षी निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. फारूख जफर या ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटामूळे अत्याधिक प्रेक्षकांमध्ये ओळखल्या गेल्या. त्यांची मोठी मुलगी मेहरु जफरने त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मेहरू जफर यांनी माध्यमांना सांगितले कि, आईची तब्येत ठीक नव्हती. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना लखनऊच्या सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयात अखेर तिने शेवटचा श्वास घेतला. फारूख जफर यांच्या पश्चात त्यांना मेहरु आणि शाहीन या दोन मुली आहेत.

या वृत्ताला दुजोरा देताना मेहरू जफर म्हणाल्या कि, श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे आईला ४ ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिची प्रकृती अस्वस्थ होती. तिची फुफ्फुसे देण्यात आलेला ऑक्सिजन घेण्यास असमर्थ होते. अखेर संध्याकाळी ६ च्या सुमारास तिने आम्हा सर्वांना पोरके केले. फारुख जफर यांचा नातू शाज अहमद यांनी ट्विटरवर लिहिले की, माझी आजी आणि स्वातंत्र्य सेनानी, माजी एमएलसी एस एम जफर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे आज संध्याकाळी लखनऊमध्ये निधन झाले.

अभिनेत्री फारूख जफर १९६३ साली लखनऊ येथे रेडिओ उद्घोषिका म्हणून कार्यरत होत्या. यानंतर अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी १९८१ मध्ये ‘उमराव जान’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी रेखाच्या आईची भूमिका अगदी अव्वल साकारली होती. यानंतर त्यांनी आमिर खानच्या ‘पीपली लाईव्ह’ आणि शाहरुख खानसोबत ‘स्वदेस’ या प्रसिद्ध चित्रपटातही काम केले होते. याशिवाय त्या ‘सुलतान’मध्येही दिसल्या होत्या. मात्र त्यांची खरी ओळख झाली ती ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटामुळेच. कारण या चित्रपटामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी फातिमा बेगमची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडकर अत्यंत दुखी असून लेखिका जुही चतुर्वेदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.