Take a fresh look at your lifestyle.

#GullyBoy | वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची वास्तव कथा

0

चित्रपटनगरी | विद्यानंद कडुकर

प्रेम, मारधाड, चरित्रपट, राजकारण अशा विविध चित्रपटांची जंत्री मागील काही दिवसांत प्रेक्षकांना पहायला मिळाली. काही बडे कलाकार फ्लॉप ठरले तर अगदी नवोदितसुद्धा आता लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. मागील ४ वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयाने लोकांना खिळवून ठेवणाऱ्या रणवीर सिंगचा गल्लीबॉय हा चित्रपट वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची कथा आपल्यासमोर मांडतो.

झोपडपट्टीतील लोकांना, पैसा मिळवून स्वतःचे आयुष्य बदलण्यासाठी अनेक मार्ग आमिष दाखवत असतात. अशात गुन्हेगारी सोपी वाटते.शिक्षण, स्वप्न बघणं कठीण वाटत रहातं. अशा गुंत्यात राहून कलेची पॅशन जपणं खूप मोठं काम आहे. हा चित्रपट धारावी झोपडपट्टीतील लोकांच्या आयुष्यावर, तिथल्या इच्छाशक्ती हरवून बसलेल्या लोकांवर, जाणवणाऱ्या आर्थिक भेदावर बोलतो. तिथली वास्तव परिस्थिती दाखवत नंतर तो अपेक्षितरीत्या शेवट होतो.

धारावी मधल्या मुराद अहमद (रणवीर सिंग) सारख्या अनेक सामान्य मुलांच्या स्वप्नांची,बंडखोरीची, प्रेमाची, मैत्रीची पॅशनची आणि त्यासाठी अवलंबावाव्या लागलेल्या मार्गांची ही गोष्ट आहे. त्याच्या संवेदनशील मनाला भिडणाऱ्या, खुपणाऱ्या साऱ्या गोष्टी तो आपल्या वहीत कवितेच्या रूपात लिहून काढतो. त्याला रॅप हा खूपसा सन्मान नसलेला संगीत प्रकार आवडतो. मुरादला स्वतःला त्यातच झोकून द्यायचं आहे. यात त्याचे मित्र आणि प्रियसी सफिना (आलिया भट) जी मेडिकलला शिकते आहे, साथ देत आहेत. पण गरिबी व त्यामूळे संकुचित विचार झालेल्या वडिलांचा (विजय राज) त्याला खूप विरोध आहे. यातच वडील दुसर लग्न करतात. त्यामुळे आपल्या आईला (अमृता सुभाष) घेऊन बाहेर पडलेल्या मुरादला नोकरी आणि गुन्हेगारीही पत्करावी लागते. या सगळ्यामध्ये धारावीच्या वस्तीतील वास्तव, तिथला अंधार त्याला लिहण्यास भाग पाडतो.

रीमा कागदी यांच लिखाण आणि झोया अख्तर यांच दिग्दर्शन जुळून आलं आहे, धारावीसारख्या वस्तीतील आयुष्य, गुन्हेगारी, बंडखोरी अस एकूणच वातावरण उभं करण्यात त्या सफल झाल्या आहेत. मुरादची स्टेजवरचा कलाकार होण्यासाठी थोडी तडफड अजून दिसली असती तर पुढच्या फळाचा अजून आनंद देऊ शकली असती. रणवीर सिंग आणि आलिया भट दोघांनीही पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखा चोख बजावल्यात. विजय राज, सिध्दांत चतुर्वेदी आणि विजय वर्मा यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे.

चित्रपटाचे छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) जय ओझा यांनी उत्तम साकारली आहे. त्यातली रंगसंगती लक्षात रहाते. विजय मौर्या यांचे संवाद बोलीभाषेतील असल्यामुळे खरे वाटतात. संगीत महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्याची जबाबदारी बऱ्याच रॅपर्स नी उचलली आहे. रॅप प्रकाराचा विचार करता गाणी अजून टोचणारी आणि सध्याच्या राजकीय परिस्थिती विषयी बोलू शकली असती. पण तरीही रॅप या बऱ्याच जणांसाठी नवीन असणाऱ्या संगीत प्रकारची नोंद घ्यावी लागते. अपना टाइम आयेगा हे डीवाईनचे अर्थपूर्ण गाणे चित्रपट पुढे नेते. एकूणच चित्रपट सगळ्याच बाजूने सक्षम झाला आहे. शेवट अपेक्षितरित्या होत असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या दोन तीन आठवड्यातील मनोरंजनाची पूर्ण जबाबदारी उचलणारा उत्साहपूर्ण असा हा चित्रपट आहे.
#बहोत हार्ड #bhot hard

Ratings **** 4/5

Galli Boy

विद्यानंद कडुकर
संपर्क क्र. – 8888242817

Leave a Reply

%d bloggers like this: