..जमलं तर बाबासाहेब जगून बघ..; हेमांगीच्या पोस्टवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशात, राज्यात, जिल्ह्यात कोणताही विषय सुरु असो, त्यावर नेहमीच परखड आणि रोखठोक वक्तव्य करणाऱ्या कलाकारांची काही कमी नाही. यामध्ये मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचाही समावेश आहे. ज्या विषयांवर कुणी भाष्य करत नाही अश्या विषयांवर बोलणारी हेमांगी तिच्या विविध फेसबुक पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आज १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यावर नेटिझन्सने देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी हेमांगीला सल्ले देण्याचे चोख काम केले आहे.
हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर हि पोस्ट केली आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!’. यावर अनेकांनी तिच्या विचारांशी सहमत असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी एक दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले कि, तू कमी पडतियेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हिमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही. जयभीम.
तर या कमेंटवर प्रतिक्रिया देताना हेमांगीने लिहिले कि, खूप महत्वाच्या गोष्टी कळायला ही वेळ लागतो. पण जेव्हा कळतात त्यासाठी grateful राहणं चुकीचं आहे? आणि जे आपल्याला कळलं ते इतरांना कळायला आपल्या सारखाच वेळ लागतोय याची खंत आहे मनात! आणि trolling चं म्हणाल तर त्याला कोणतेही नियम, धरबंध नाहीत. याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, सविस्तर लिहायला पाहिजे होते. यावरही हेमांगीने पलटून प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने लिहले कि, बाबासाहेबांनी सविस्तरच लिहिलंय, ते तरी कळलंय का आपल्याला?. तसेच या पोस्टवर आणखी बऱ्याच नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.