हृता दुर्गुळे साकारणार ‘अनन्या’ची भूमिका; धाडसी वृत्तीची गोष्ट रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी सकारात्मक आणि ऊर्जादायी टॅगलाईन असलेल्या ‘अनन्या‘ या नव्याकोऱ्या चित्रपटाचे पोस्टर ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आले. यानंतर सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हि कथा आहे जिद्दीची आणि धाडसी प्रवृत्तीची. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत लोकांमध्ये वेगळीच उत्सुकता आहे. हे पोस्टर खूप काही एकावेळी बोलताना दिसतंय. जगणं आणि जिद्दीने जगणं यातला फरक सांगण्यासाठी ‘अनन्या’ येतेय. येत्या १० जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला अनन्य रुपेरी पडद्यावर येणार आहे.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित ‘अनन्या’ हा सकारात्मक दृष्टिकोन जागवणारा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाच्या निर्मितीची सूत्रे जबाबदारीने पेलली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक उमेद घेऊन येणार आहे. ‘अनन्या’ येत्या १० जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हृता दुर्गुळे या सिनेमात काम करताना दिसत आहे. तिने याआधी झी युवावरील लोकप्रिय मालिका फुलपाखरूमध्ये काम केले होते. यानंतर झी मराठीवरील चालू मालिका मन उडू उडू झालं यामध्येही ती ‘दिपू’ नामक मुख्य भूमिकेत दिसत आहे.
अनन्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हि कथानकाशी जोडली गेली आहे. त्यामुळे मनापासून तिने व्यक्त होत म्हटले कि, “आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तसेच चित्रपटाचे निर्माता रवी जाधव यांनी चित्रपटाविषयी बोलताना म्हटले कि, ” महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचा सन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.” याशिवाय निर्माता संजय छाब्रिया म्हणाले कि, ”जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. ‘अनन्या’मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”