Take a fresh look at your lifestyle.

सायनावर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांकडून अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या प्रकरणावर भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने एक ट्विट लिहिले होते. यावर अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींच्या प्रतिक्रिया सकारात्मक तर काहींच्या नकारात्मक होत्या. पब्लिक फिगर असल्यामुळे हि बाब नवी नसली तरीही या टीकाकारांमध्ये एका अभिनेत्याचा समावेश असणे चुकीचे आहे हे हि तितकेच खरे. या ट्विटवर टीका करत दाक्षिणात्य अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट रंग दे बसंती फेम सिद्धार्थ नारायणने खालची पातळी गाठली आणि अश्लिल टिप्पणी केली होती. यामुळे त्याला ट्विटरवर चांगलाच ट्रोल करण्यात आला होता. यानंतर त्याने ट्विट करून सायनाची माफीदेखील मागितली पण अखेर त्याच्यावर हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी वादग्रस्त कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हैदराबाद सायबर क्राइम विंगचे अतिरिक्त डीसीपी केव्हीएम प्रसाद यांनी माध्यमांसोबत बोलताना या प्रकरणाची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी मीडियाला सांगितले की, प्रेरणा नामक एका महिलेने अभिनेता सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अभिनेत्याविरुद्ध आयपीसी ५०९ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तूर्तास अभिनेत्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्याचे झाले असे कि, काही दिवसांपूर्वी सायनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर ट्वीट केले होते. या ट्विटवर सिद्धार्थने “* वर्ल्ड चॅम्पियन… देवाचा आभारी आहे की, आमच्याकडे भारताचे रक्षक आहेत” अशी आक्षेपार्ह कमेंट केली होती. या कमेंटमुळे सिद्धार्थविरोधात लोकांनी ट्रोलिंग केले. त्याच्या कमेंटवर आक्षेप घेतला. यानंतर अभिनेत्याने ट्विटवर माफीनामा सादर करीत सायनाची माफीही मागितली होती.

सिद्धार्थने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते कि, “प्रिय सायना, मी एका दिवसापूर्वी तुझ्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहिलेल्या माझ्या असभ्य वर्तनामुळे मला तुझी माफी मागायची आहे. मी अनेक गोष्टींवर तुझ्याशी असहमत असू शकतो. परंतु माझी निराशा किंवा राग आधीचा आहे. तुझे ट्विट वाचून मी माझ्या शब्दांना न्याय देऊ शकत नाही.” एखाद्या विनोदाला समजावून सांगायचे असल्यास, तो विनोदही राहत नाही. त्यामुळे मी माझ्या विनोदाबद्दल माफी मागतो. मी माझ्या शब्द निवडीवर आणि विनोदावर जोर दिला पाहिजे. यामागे खरंच माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. “मी स्वतः एक कट्टर स्त्रीवादी समर्थक आहे आणि मी तुला खात्री देऊ शकतो की माझ्या ट्विटमध्ये कोणतेही लिंगसंबंधित विधान नव्हते आणि एक महिला म्हणून तुझ्यावर शाब्दीक हल्ला करण्याचा नक्कीच माझा कोणताही हेतू नव्हता.” “आशा आहे की तु या सर्व गोष्टी विसरशील आणि माझी माफी स्वीकार करशील. तु नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन आहेस.”

या माफीवर प्रतिक्रिया देताना सायना म्हणाली, सिद्धार्थने माफी मागितली त्याचा आनंद आहे. कारण त्याने जे वक्तव्य केले होते त्यात तो एका महिलेबद्दल बोलला होता. कुठल्याही महिलेला अशा प्रकारे टार्गेट करणे,ही चुकीची बाब आहे. परंतु ठीक आहे,जे झाले त्या गोष्टीचा मी फार विचार करत नाही.