Take a fresh look at your lifestyle.

मला ‘ओनोमेटोमॅनिया’ हा आजार आहे; नसिरुद्दीन शहांची मानसिक आजाराशी झुंज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या प्रकृतीविषयी एक मोठासा खुलासा केला आहे. त्यांनी एका माध्यमाशी बोलताना आपण ‘ओनोमेटोमॅनिया’ या आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे. ओनोमेटोमॅनियाने त्रासलेली व्यक्ती एखादा विशिष्ट शब्द किंवा वाक्य सतत बोलत असते. यामुळे शांत झोपही लागत नाही असे त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर सांगतात कि, ओनोमॅटोमॅनिया ही एक अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती विशिष्ट शब्द, वाक्य, ओळ सतत बडबडत असते. अनेकदा एखादा विशिष्ट शब्द किंवा वाक्य आठवत नसेल तर त्यामुळेही ते वारंवार त्याबद्दल विचार करत असतात.

आपल्या प्रकृतीविषयी बोलताना नसिरुद्दीन शहा यांनी पहिल्यांदाच काही खाजगी गोष्ट सांगितली आहे. एका युट्यूब चॅनलशी बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. दरम्यान ते म्हणाले कि, ‘मला ओनोमेटोमॅनिया हा आजार आहे. मी मस्करी करत नाही आहे. याबद्दल तुम्ही डिक्शनरीमध्ये तपासू शकता. या आजारामुळे तुम्ही विनाकारण एखादा शब्द, वाक्य, श्लोक किंवा भाषण पुन्हा पुन्हा उच्चारत राहता. मी संपूर्ण वेळ हेच करत असतो. त्यामुळे मला झोपेतही आराम मिळत नाही. मी झोपेत असतानाही, मला आवडणारी वाक्य बडबडत असतो.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत नसिरुद्दीन शहा यांचे नाव घेतले जाते. शिवाय नसीरुद्दीन हे त्यांच्या पिढीतील सर्वात हुशार अभिनेते मानले जातात. शिवाय ते अजूनही चित्रपट विश्वात कार्यरत असून मोठंमोठ्या आघाडीच्या कलाकारांना तगडी टक्कर देताना दिसतात. मनोरंजन विश्वातील त्यांचे योगदान मोठे आहे. यासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या अतिशय मानांकित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.