Take a fresh look at your lifestyle.

ती म्हणाली तेच एखादा मुस्लिम म्हणाला असता तर..; कंगना रनौतच्या वक्तव्यावर ओवैसींची तिखट प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री कंगना रनौतने अलीकडेच पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्यावरून अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘भारताला सन १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र भीक होतं’ या वक्तव्यावरुन सध्या देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर चहू बाजुंनी तिच्यावर टीकादेखील सुरु आहेत. इतकेच काय तर, कंगनाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या आणि तिच्यावर कारवाई करा अशीही मागणी होत आहे. अशात आता कंगनाच्या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया आली आहे. अलिगडमध्ये एका भाषणादरम्यान ओवैसींनी कंगना आणि केंद्र सरकारवरचा समाचार घेतला आहे.

या भाषणात असदुद्दीन ओवैसी म्हणतात कि, “मोहतरमा म्हणजेच कंगनाला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. त्यानंतर मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारताला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाल्याचं तिने म्हटलं. जे कंगना म्हणाली, तेच कोणी मुस्लिम म्हणाला असता, तर तुम्ही त्याच्यावर UAPA लावला असता. त्याला तुरुंगात पाठवलं असतं, त्याला देशद्रोही ठरवलं असतं. पण आता कुणीही काहीही करत नाही. का करत नाही? कारण ती क्वीन आहे आणि तुम्ही किंग आहात.

पुढे, भारत – पाकिस्तान सामन्यावर कोणी वक्तव्य केलं, तर बाबांनी त्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम लावण्याची आणि तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली” असेही ओवैसी म्हणाले. खरतर असे म्हणण्यामागे ओवैसींचा रोख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे होता. कारण पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांना योगी आदित्यनाथांनी इशारा दिला होता. दरम्यान कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? की देशद्रोह फक्त मुस्लिमांसाठी मर्यादित आहे? असा तिखट सवाल ओवैसींनी योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.