Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’च्या IMDb रेटिंगमध्ये घसरण..?; दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। IMDb म्हणजे इंटरनेट मुव्ही डेटाबेस. हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यावर दिले जाणारे रेटिंग एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. यावर स्टार्स पद्धतीने रेटिंग केले जाते. IMDb 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना येथे दर्जा दिला जातो. हे रेटिंग जितकं जास्त तितका तो चित्रपट, मालिका वा वेब सीरिज लोकांना आवडल्याचे समजते. त्यामुळे हे रेटिंग अतिशय आवश्यक मानले जाते. मात्र गेल्या शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या रेटिंगमध्ये घसरण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. हे पाहिल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी संताप व्यक्त केला आहे.

IMDb Rating

 

एकीकडे थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून दणक्यात कमाई सुरू आहे. तसेच प्रेक्षकांसह अक्षय कुमार, कंगना रणौत, परिणीती चोप्रा, आर माधवन, परेश रावल यांसारख्या सेलिब्रिटींनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. दरम्यान या चित्रपटाला १० पैकी १० IMDb रेटिंग मिळाले होते. मात्र अचानक १० वरून ही रेटिंग ८.३ वर आली आहे. याचे कारण म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासाठी त्यांनी रेटिंग मोजण्याची पद्धत बदलली आहे. IMDb रेटिंग पेजवरून याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान ‘द काश्मीर फाईल्सच्या व्होटिंग अॅक्टिव्हिटीमध्ये असमानता असल्याचं आमच्या रेटिंग यंत्रणेला आढळलं आहे. आमच्या रेटिंग सिस्टिमची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही हा पर्यायी मार्ग अवलंबला आहे’, असं IMDbने स्पष्टीकरण दिले आहे. तूर्तास १,३५,००० मतांसह ‘द काश्मीर फाईल्स’ला ८.३ रेटिंग प्राप्त झाली आहे. तर ९४% लोकांनी १०चे रेटिंग दिले आहे. तसेच ४% लोकांनी १ रेटिंग दिले आहे.

अशा पद्धतीने जेव्हा मतदानात असमानता आढळते, तेव्हा सिस्टमची विश्वासार्हता टिकवण्यासाठी पर्यायी मार्ग लागू केला जातो, असे वेबसाईटकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान रेटिंगमधील घसरण पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा प्रकार अनैतिक आहे अशी प्रतिक्रिया आहे.