Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधानांकडून लता मंगेशकर यांना लोकसभेत श्रद्धांजली अर्पण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी सकाळी संपूर्ण जगभराला धक्का देणारी अत्यंत दुःखद बाब घडली आणि ती म्हणजे राष्ट्राचा आवाज गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन. वयाच्या ९३ व्या वर्षी लता दीदींनी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्य दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचा महासागर लोटला होता. इतकेच नव्हे तर दीदींसमोर अगदी पीएम ते सीएम सारेच नतमस्तक झाले. दीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्य संस्कार पार पडले. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहिले होते. त्यांनी दीदींना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला. यानंतर आज लोकसभेत लता दीदींना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत गायिका लता मंगेशकर यांना अत्यंत शोकाकुल होत श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हादरला आहे. पण त्या एक असे व्यक्तिमत्व होत्या ज्यांच्यासमोर संपूर्ण देशभरातील लोक नतमस्तक झाले. कारण त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र आणले. अशा आशयाचे विधान करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींचे स्मरण करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याआधी मोदी लता दीदींच्या अंत्य संस्कारासाठी हैद्राबाद दौऱ्यातून थेट मुंबईत दाखल झाले होते. तेव्हा मोदींच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव स्पष्ट दिसत होते.

नरेंद्र मोदी यांनी लता दीदींच्या निधनानंतर ट्विट करीतच आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते कि, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.

लता दीदींच्या गाण्यांनी विविध प्रकारच्या भावना प्रकट केल्या आहेत. त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्या नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल उत्कट होत्या. त्यांना नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. लता दीदींच्या निधनाबद्दल मी माझ्या भारतीय सहकाऱ्यांसोबत शोक व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून मी शोक व्यक्त केला आहे. ओम शांती.