Take a fresh look at your lifestyle.

यावर टिप्पणी करणे शहाणपणाचे नाही; नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी NCBचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ड्रग प्रकरणात आरोपांचे सतत सत्र चालवले आहे. दरम्यान वानखेडे यांची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात असल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला होता. यावर समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी व मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत क्रांतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून माध्यमांनी संभ्रमित होऊ नये असे सांगितले आहे. तसेच समीर वानखेडे यांनी थेट माध्यमांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या पोस्टमध्ये अभिनेत्री क्रांती रेडकरने लिहिले आहे कि, प्रिय मीडिया, मला माहित आहे की श्रीमान नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न आहेत. मी सांगू इच्छिते की, माझी बहीण या प्रकरणात पीडित होती आणि पुढेही आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या मते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर टिप्पणी करणे शहाणपणाचे नाही. माझी बहीण श्री मलिक यांचे ट्विट कायदेशीररित्या हाताळणार आहे. श्री समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. यासोबत कॅप्शनमध्ये, माझ्या ट्विटर हँडल द्वारे याबद्दल अधिक अपडेट्स देईन असे क्रांती रेडकर म्हणाली.

तर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले कि, हे प्रकरण जवळपास १३ ते १४ वर्ष जुनं आहे. हर्षदा रेडकर यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात केस झाली, तेव्हा माझा आणि क्रांती रेडकर यांचा विवाहदेखील झाला नव्हता. माझ्या मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध जानेवारी २००८ मध्ये पुण्यात केस दाखल करण्यात आली होती. तेव्हा मी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सर्व्हिसमध्येही नव्हतो. क्रांती रेडकर यांच्यासोबत २०१७ सालामध्ये माझा विवाह झाला, म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील केसनंतर तब्बल ९ वर्षांनी. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही एक संबंध येत नाही. ही घटना जुनी असून विनाकारण माझं नाव यात जोडलं जात आहे”.