Take a fresh look at your lifestyle.

ED’च्या कारवाईचा जॅकलिनला दणका; 7 कोटी 27 लाखांची मालमत्ता जप्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात ईडीच्या कारवाई जोरदार सुरु असून हा ऍक्शन मोड बऱ्याच लोकांच्या अंगलट आल्याचे दिसले आहे. यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या कारवाईमध्ये जॅकलीनची ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही संपूर्ण मालमत्ता फसवणुकीच्या आरोपात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला भेट म्हणून दिली आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईमुळे जॅकलिनला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिनकडे ७ कोटी २७ लाख इतक्या रकमेची एफडी आहे. हि एफडी ईडीने जप्त केली असून आतापर्यंतची जॅकलिनवरील आदींची हि मोठी कारवाई मानली जातेय. ईडीच्या टीमने अभिनेत्रीची आतापर्यंत ३ वेळा चौकशी केली आहे ज्यामध्ये तिहार तुरुंगात असलेलया सुकेश चंद्रशेखरबाबत अधिक माहिती विचारण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे ईडीच्या सूत्रांनुसार, अभिनेत्री जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यात अत्यंत जवळचे संबंध होते. शिवाय सुकेशने जॅकलिनला सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, आयात केलेली क्रॉकरी दिली होती. शिवाय ५२ लाख रुपये किमतीचा घोडा तसेच ९- ९ लाख रुपये किमतीच्या एकूण ४ पर्शियन मांजरीदेखील भेट दिल्या होत्या. इतकेच नाही तर, सुकेशने जॅकलिनसाठी कित्येक चार्टर्ड फ्लाइट्स बुक केल्याची माहिती ईडीकडे आहे. आतापर्यंत सुकेशने जॅकलिनवर सुमारे १० कोटी रुपये खर्च केले असल्याचे या माहितीच्या आधारे सांगितले जात आहे.

सुकेशने केलेल्या दाव्यानुसार, तो जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे काही फोटोदेखील असेच काहीसे दर्शवितात. मात्र, जॅकलिनने हे नाते स्पष्टपाने नाकारले आहे. तपासानुसार, तिहार तुरुंगात असतानाही सुकेश जॅकलिनशी फोनवर बोलतो असे समोर आले होते. सुकेश चंद्रशेखरवर रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींची २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेश कधी तो पीएम ऑफिस तर कधी गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवायचा आणि पैसे उकळायचा. या फसवणुकीत तिहार तुरुंगातील अनेक अधिकारी सहभागी असल्याचे समोर आले होते.