Take a fresh look at your lifestyle.

प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार जय मल्हार फेम देवदत्त नागे

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने जेव्हापासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा केली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो वेगेवगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. पौराणिक रामायणावर हा चित्रपट आधारित असून यात भगवान रामाच्या भूमिकेत प्रभास दिसणार आहे. एका मुलाखतीत ओम राऊतने सांगितले होते की, जेव्हा त्याने चित्रपटातील भगवान रामाच्या भूमिकेचा विचार केला तेव्हा त्याच्यासमोर फक्त प्रभासचा चेहरा आला. त्यानंतर आता आणखी एक विशेष म्हणजे या चित्रपटातील हनुमानाची भूमिका अभिनेता देवदत्त नागे साकारणार आहे.

आदिपुरुष या चित्रपटातील प्रभु श्रीरामच्या भूमिकेत प्रभास तर क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. इतकेच नव्हे तर सैफ अली खान या चित्रपटातील खलनायक अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी कलाकारांना विशेष संधी देण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डेही झळकणार आहे.

याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अभिनयच्या एका पोस्टवरुन तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात निश्चितच झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर हनुमानच्या भूमिकेत कोणता कलाकार असेल याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर आता ‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे हनुमानच्या भूमिकेत झळकणार आहे, अशी बातमी समोर येत आहे.

 

जय मल्हार मालिकेतून खंडोबा देवाच्या भूमिकेमुळे देवदत्त नागे घराघरात पोहचला. यानंतर नुकताच तो ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत झळकला होता. तो सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. या चित्रपटातील हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी तो अतिशय उत्सुक आहे हे तो भूमिकेसाठी घेत असलेल्या प्रचंड मेहनतीतून दिसून येत आहे.

हा चित्रपट पाहण्याची रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पुढच्या वर्षी २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर हिंदी शिवाय तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये रसिकांना पाहता येणार आहे.