हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकमान्य टिळक यांनी ‘लोकोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि लोकांना स्वराज्याचा कानमंत्र दिला. या स्वराज्याच्या दारी स्वातंत्र्याचे तोरण बांधणाऱ्या या महापुरुषांच्या गाथा आजही धगधगत्या आहेत. स्वराज्याचे सुराज्य करण्याचे बीज रोवणारा हा गणेशोत्सव सगळ्यांसाठीच स्फूर्तिदायक असतो. म्हणूनच या निमित्ताने अभिनेता अमोल कोल्हे अभिनित ‘शिवप्रताप – गरुडझेप’ या ऐतिहासिक चित्रपटातील शिवशक्तीमय गीत ‘जय भवानी जय शिवराय’ प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. हा चित्रपट इतिहासातील आणखी एका सुवर्ण पानाची गोष्ट सांगणारा आहे. या चित्रपटातील धगधगते आणि नसानसांत शिरशिरी भरणारे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
‘मराठमोळया मातीमधूनी, झऱ्यात खळखळणारी… नसानसांमध्ये शिवशक्ती, अजून सळसळणारी !
मनात आमच्या सत्वाची, रणभैरवी दुमदुमणारी !’…
असे ‘जय भवानी जय शिवराय’ या गाण्याचे बोल आहेत. हे शब्द कट्यार होऊन शत्रूच्या काळजात शिरणारे आणि जोश बनून स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या शिलेदारांच्या नसानसांत सळसळणारे आहेत. मनामनांत उत्साह निर्माण करणाऱ्या या गाण्याचे बोल हृषिकेश परांजपे यांनी लिहिले आहेत. तर प्रसिद्ध मराठी गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणे आपल्या आवाजात स्वरबद्ध केले आहे. तसेच शशांक पोवार यांचे संगीत लाभले आहे.
या नव्या आणि जोशदायी गाण्याच्या प्रदर्शनानंतर अभिनेते आणि निर्माते डॉ. अमोल कोल्हे व्यक्त झाले आहेत. ते म्हणाले कि, ‘स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा हा लोकोत्सव, स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या प्रयत्नांना पूरक कसा ठरू शकेल याचा विचार आता करण्याची गरज निर्माण झाली असून या शिवशक्तीमय गीतातून ही भावना जागृत होण्यास मदत होईल’. डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंग आणि सुटका या शौर्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Discussion about this post